मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लावण्याची जोरदार तयारी सुरू केली असून, त्यासाठी सोमवारी दिवसभर बैठका घेण्यात आल्या. १५ एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांच्याशी लॉकडाऊन व त्याचा फटका बसणार असलेल्यांना मदत देण्यासंदर्भात चर्चा केली. त्यापूर्वी अजित पवार यांनी संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली.शिवभोजन थाळीची व्याप्ती वाढवून ती अधिकाधिक लोकांना मिळेल याची व्यवस्था करणे, रेशन दुकानांतून तांदूळ, गव्हासोबतच डाळी, साखर, तेलाचाही पुरवठा करण्याचे नियोजन केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याशिवाय दारिद्र्यरेषेवरील व्यक्तींना ८ रुपये किलो गहू आणि १२ रुपये किलो दरावर तांदूळ देण्याची नोव्हेंबरपासून बंद झालेली योजना पुन्हा सुरू करण्याचाही विचार आहे. १० लाख नोंदणीकृत बांधकाम मजुरांना भांडीकुंडी देण्याऐवजी त्यांच्या बँक खात्यात तत्काळ प्रत्येकी पाच हजार रुपये टाकण्याचाही विचार सुरू आहे. वित्त विभागाने तयार केलेले पॅकेज अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली. लॉकडाऊनच्या काळात विमान, रेल्वे, बससह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
गोरगरिबांना मदत दिली जाईल - पवारलॉकडाऊनचा फटका बसणार असलेल्या गोरगरिबांसाठी पॅकेज दिले जाणार आहे. राज्याची आर्थिक स्थिती बिकट असली तरी सध्याच्या परिस्थितीत त्याचा विचार न करता लॉकडाऊनचा फटका बसणार असलेल्या गोरगरिबांना मदत देणे अत्यावश्यक आहे आणि ती दिली जाईल, असे अजित पवार यांनी बैठकीत सांगितले.