मनसे प्रमुख राज ठाकरे यांची अवस्था 'तेलही गेले अन् तूपही गेले' या म्हणीप्रमाणे झाली आहे. उमेदवार उभे न करता त्यांनी इतरांसाठी केलेला खटाटोप वाया गेला.
हिंदी सिनेमाचे एक गाजलेले गाणे आहे. त्या गाण्यासारखीच अवस्था आज मनसेची आणि राज ठाकरे यांची झाली आहे. 'बंद मुठ्ठी लाख की... खुली तो प्यारे खाक की...' या अवस्थेला आपण का आलो याचे उत्तर स्वतः राज यांनाच द्यावे लागणार आहे. हा निकाल अनाकलनीय आहे, अशी प्रतिक्रिया राज यांनी व्यक्त केली आहे. खरं तर राज यांचे एकूण राजकारणच अनाकलनीय आहे.
२०१४च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाच्या विरोधात उमेदवार उभे केले आणि पाठिंबा मात्र नरेंद्र मोदी यांना दिला. राज यांच्या या दुहेरी भूमिकेमुळे मतदार नव्हे, तर त्यांचे उमेदवारही गोंधळून गेले होते. या निवडणुकीत तर त्यांनी एकही उमेदवार उभा केलेला नसताना जोरदार प्रचार केला. राज यांचा प्रचार 'बेगाने शादी में...' अशी टीकाही झाली. उत्तम वक्तृत्व शैली, हजरजबाबीपणा, तरुणाईवर प्रभाव पाडू शकेल असे व्यक्तिमत्व आणि मीडियात 'न्यूज मेकर' अशी प्रतिमा असताना राज यांचा राजकीय आलेख उंचावताना दिसत नाही. राज ठाकरे यांनी पाच-सहा ठिकाणी सभा घेऊन नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार शरसंधान साधले. त्यांच्या या झंझावाती प्रचाराचा फटका भाजपा-सेनेच्या उमेदवारांना बसेल, असे भाकित वर्तवले गेले. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. याचाच अर्थ ज्यांनी सभांना गर्दी केली, त्यांनीही मोदींनाच मते दिली की काय?