सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे पवार कुटुंबातीलच दोन उमेदवार हे एकमेकांसमोर उभे ठाकल्याने आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप झाल्याने बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक चांगलीच गाजली. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत दोन्ही गटांकडून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू होते. दरम्यान, आज मतदानाला सुरुवात झाल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीअजित पवार गटावर पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप केला या आरोपाला आता अजित पवार यांनीही उत्तर दिलं आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, आतापर्यंत मी सात विधानसभा आणि एक विधानसभेची निवडणूक लढवली आहे. मी असले प्रकार कधी करत नाही. विरोधकांमधील बगलबच्चे सुरुवातीपासून असे आरोप करत होते. पण मी त्याला फार महत्त्व देत नाही. या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाचं पथक असतं, पोलीस यंत्रणा असते, निवडणूक आयोगाचे निरीक्षक असतात. ते आरोप करतात, तसे आरोप मीही करू शकतो, असा इशारा अजित पवार यांनी दिला.
यावेळी प्रसारमाध्यमांनी अधिक विचारणा केली असता, अजित पवार म्हणाले की, तुम्ही स्वत: ती बँक उघडी पाहिली होती का? तसेच तो व्हिडीओ कालचाच होता का, याची पडताळणी केली आहे का? तुमच्याकडे व्हिडीओ आहे म्हणून काही पण प्रश्न विचारणार का? जो समोरून आरोप करत आहे त्याच्यावर थोडा परिणाण झालेला दिसतोय. त्यामुळे त्याच्याकडून आरोप केले जात आहेत. त्यामुळे त्या आरोपांना फार महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही, असा टोला अजित पवार यांनी रोहित पवार यांचं नाव न घेता लगावला.
दरम्यान, आज सकाळी मतदानासाठी आलेल्या आमदार रोहित पवारांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले होते. बारामतीत पोलिसांच्या बंदोबस्तात पैशाचा पाऊस पाडला जात आहे असं सांगत रोहित पवारांनी ट्विटवर काही व्हिडिओ शेअर केले होते. बारामतीत काही ठिकाणी २५०० रुपये, ३००० रुपये, ४ हजार रुपये प्रति मत अशाप्रकारे पैसा वाटला गेला. पीडीसीसी बँक गरीबाला ५ वाजता बंद होते. परंतु पैसे वाटण्यासाठी रात्री १-२ पर्यंत सुरू राहते. पीडीसीसी बँक, कर्मचारी आणि झेड सिक्युरिटीचा वापर केला गेला. पोलिसांच्या गाडीचा पैशासाठी वापर झाला पण अनेक ठिकाणी लोकांनी पैसे नाकारले. ही लढाई जनशक्तीविरुद्ध धनशक्ती झालीय. जनशक्ती ही शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या बाजूने तर धनशक्ती ही अजित पवारांच्या बाजूने असल्याचा टोला त्यांनी लगावला.