पालघर लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपा, ठाकरे गट आणि बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे. त्यात भाजपाने हेमंत सवरा, ठाकरे गटाने भारती कामडी आणि बविआने राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तिन्ही पक्षांची येथे बऱ्यापैकी ताकद असल्याने अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, येथील बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केलेल्या एका विधानामुळे भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. पालघर लोकसभा मतदारसंघातील सहाही आमदार आमच्यासोबत आहेत, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघातील वसई, विरार भागात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा प्रभाव आहे. तसेच या मतदारसंघातील वसई, नालासोपारा आणि बोईसर या विधानसभा मतदारसंघात बविआचे आमदार आहेत. तर पालघरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे श्रीनिवास वनगा, विक्रमगडमध्ये शरद पवार गटाचे सुनील भुसारा आणि डहाणूमध्ये सीपीएमचे विनोद निकोले हे आमदार आहेत.
दरम्यान, आज प्रसारमाध्यमांशी बोलताना हितेंद्र ठाकूर म्हणाले की, माझ्याविरोधात हे आमदार एकही शब्द बोलणार नाहीत. कारण त्यांना कुठल्याही कामात मदत करताना मी पक्षभेद करत नाही. मग डीपीसीची बैठक असो वा मंत्रालयातील कामं असोत, तीनही आमदारांबाबत मी कोणता पक्ष आहे हे पाहत नाही. हे तीन आमदार आमचे आणि तीन आमदार आमच्या जिल्ह्याचे आहेत. त्यामुळे सहाही आमदार आमचे आहे. तसेच ते येत्या लोकसभा निवडणुकीत ते आम्हाला एक हजार एक टक्के मदत करतील, अशी आम्हाला खात्री आहे.