कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्याविरोधात भाजपाने ठाकरेंचे कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे. राणेंना दिलेल्या उमेदवारीमुळे दक्षिण कोकणातील राजकीय वातावरण चांगलंच गरम झालं असून, ठाकरे गट आणि राणेंमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. नारायण राणेंच्या प्रचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी नेते येणार आहेत. या दौऱ्यांवरून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात येऊ नये, इथे आल्यास येथील जनता त्यांना कोकणचं पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही’, असा इशारा भास्कर जाधव यांनी दिला आहे.
नारायण राणेंच्या प्रचारासाठी होणाऱ्या अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांच्या सभांवरून टोला लगावताना भास्कर जाधव म्हणाले की, खाशाबा जाधव एवढेसे होते. त्यांच्यासमोर भलेमोठे परदेशी पैलवान होते. तरीही त्यांनी त्यांना पराभूत करून पहिलं सुवर्णपदक जिंकलं होतं. आमचे विनायक राऊतही तसेच आहेत. मी आज अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांना सांगतो की तुम्ही कोकणात यायच्या भानगडीत पडू नका. इथे आलात तरी विनायक राऊत आणि कोकणातील जनता तुम्हाला कोकणच्या मातीचं पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधून विनायक राऊत यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यांनी नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांना पराभूत केले होते. आता सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून विजयाची हॅटट्रिक करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र यावेळी विनायक राऊत यांच्यासमोर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आव्हान आहे.