वर्धा - गेली अनेक वर्षे आम्ही वर्धेतून निवडणुका जिंकलो; पण वर्ध्याच्या मैदानातून ‘पंजा’ला गायब करू शकलो नाही. आम्ही ‘काँग्रेसमुक्त वर्धा’चे स्वप्न पाहिले होते. जे आम्हाला जमले नाही, ते शरद पवारांनी करून दाखविले. या जिल्ह्यातून काँग्रेसला त्यांनी हद्दपार करून दाखवले, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.
महायुतीचे उमेदवार खासदार रामदास तडस यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, इंडिया आघाडीमध्ये २५ पक्ष आहेत आणि हे सर्व पक्ष ‘इंजिन’ आहेत. तिथे डबा कुणीच नाही, तर एनडीएमध्ये मोदी हे इंजिन आहेत आणि आपण सर्व पक्ष डबे आहोत. आपल्या डब्यांमध्ये सर्वसामान्यांना बसायला जागा आहे. मोदींनी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास केला. त्या माध्यमातून गरिबांना घर, शौचालय, गॅस, वीज कनेक्शन, घरी पाणी आणि मुद्रा लोन दिले. यात प्राधान्य महिलांना देण्यात आले आहे.