मुंबई - महायुतीच्या जागावाटपात भाजप दबाव वाढवत असल्याचा सूर शिंदेसेनेकडून लावला जात असून आपल्या खासदारांचे आणि निकटस्थांचे मतदारसंघ खेचून आणताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी झाल्याचे चित्र आहे. तोडगा निघण्याऐवजी चित्र अधिक क्लिष्ट बनले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये भाजपच लढणार असे परस्पर जाहीर करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी धक्का दिला. सर्वेक्षणाचे कारण देत भाजप उमेदवार बदलण्यासाठी आमच्यावर दबाव आणत आहे, महायुतीसाठी हे घातक असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाकडून आली आहे.
वेगवेगळी सर्वेक्षणे, स्थानिक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांचा फीडबॅक या आधारे शिंदेंनी त्यांचे काही उमेदवार बदलले पाहिजेत असे भाजपने सुचविल्याची माहिती आहे. त्यात भावना गवळी (यवतमाळ-वाशिम), धैर्यशील माने (हातकणंगले) व हेमंत पाटील (हिंगोली) या तीन जागांचा समावेश आहे.
भाजपने असा दबाव आणणे योग्य नाही. भाजपला नकोत म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे उमेदवार का बदलावेत? भाजपच्या षड्यंत्राला शिंदे बळी पडणार नाहीत, अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री व शिंदे गटात असलेले सुरेश नवले यांनी दिली.
ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि मुंबई उत्तर पश्चिम हे मतदारसंघ मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर शिंदेसेनेने एकही मतदारसंघावरील दावा अद्याप तरी सोडलेला नाही.
भुजबळांना ‘वरून’ शब्द; स्थानिक नेत्यांची पंचाईतछगन भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी देण्याची ‘कमिटमेंट’ वरिष्ठ पातळीवरून म्हणजे दिल्लीतून झाले असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांची पंचाईत झाली आहे. वर्धेत रामदास तडस (तेली) यांना आधीच उमेदवारी दिली आहे. आता नाशिकमध्ये भुजबळ यांना उमेदवारी दिल्यास माळी समाजात आणि ओबीसींमध्ये सकारात्मक मेसेज जाईल, असे भाजपश्रेष्ठींचे मत असल्याचे सांगितले जाते. नाशिक मतदारसंघ भुजबळांसाठी अनुकूल नसेल असे राज्यातील नेत्यांचे म्हणणे असल्याची माहिती मिळते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंसाठी प्रचंड आग्रही आहेत. त्यामुळे या जागेबाबतही निर्णय होऊ शकलेला नाही.
सातारा भाजपकडे जाण्याची शक्यतासूत्रांनी सांगितले, की महायुतीत सातारा येथील जागा भाजपकडे जाईल असे जवळपास ठरले आहे. तेथे अजित पवार गटाने आग्रह धरला असला तरी ही जागा आम्हालाच हवी असे भाजपकडून त्यांना स्पष्टपणे कळविण्यात आले आहे. साताऱ्याच्या बदल्यात नाशिक राष्ट्रवादीकडे जाईल, असे दिसते.
शिंदेंचा बालेकिल्ला ठाणेही भाजपकडे?ठाणे भाजपकडे जाईल असे चित्र आहे. संजीव नाईक तेथे भाजपचे उमेदवार असू शकतात. ठाण्याचा आग्रह शिंदेसेनेने सोडलेला नाही. त्यामुळे तिढा कायम आहे. ठाण्यात भाजपचा आमदार आहे, नवी मुंबईत व मिरा-भाईंदरमध्येही आमचे प्राबल्य आहे या आधारावर आम्ही दावा केला असल्याचे एका भाजप नेत्याने सांगितले.'
भाजप खासदार उद्धवसेनेच्या वाटेवरमुंबई : जळगावचे भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी उद्धवसेनेचे नेते संजय राऊत आणि त्यापाठोपाठ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारी ‘मातोश्री’वर भेट घेतली. त्यानंतर तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले उन्मेष पाटील बुधवारी उद्धवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या. ठाकरेंकडून त्यांना जळगावची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही मैत्रीपूर्ण भेट होती. उद्या (बुधवारी) सकाळी मी तुमच्याशी सविस्तर बोलेन, असे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.