बाहेरून आले, उमेदवार झाले! महायुतीसारखंच मविआनेही दिलंय आयारामांना तिकीट; १३ जणांची लिस्ट
By बाळकृष्ण परब | Published: April 17, 2024 08:40 AM2024-04-17T08:40:41+5:302024-04-17T08:42:32+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: राज्यात सुरू असलेले फोडाफोडीचे राजकारण आणि बाहेरून आलेल्या नेत्यांना संधी देण्यावरून भाजपावर (BJP) टीका करणाऱ्या महाविकास आघाडीमधील (MVA) पक्षांनीही बाहेरून आलेल्या नेत्यांना अनेक ठिकाणी उमेदवारी दिल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
-बाळकृष्ण परब
यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षांमधील काही जागांवरील अपवाद वगळता बहुतांश उमेदवारांची घोषणा झाली आहे. या उमेदवारांच्या यादीकडे नजर टाकल्यास एकीकडे भाजपाने इतर पक्षांमधून येऊन पक्षात स्थिरावलेल्या अनेक विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिल्याचे दिसत आहे. तसेच महायुतीमध्येही उमेदवारांची अदलाबदल झालीय. दुसरीकडे राज्यात सुरू असलेले फोडाफोडीचे राजकारण आणि बाहेरून आलेल्या नेत्यांना संधी देण्यावरून भाजपावर टीका करणाऱ्या महाविकास आघाडीमधील पक्षांनीही बाहेरून आलेल्या नेत्यांना अनेक ठिकाणी उमेदवारी दिल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
महाविकास आघाडीतील उमेदवारांची यादी पाहिल्यास त्यातील किमान डझनभर उमेदवारांनी मागच्या काही वर्षांमध्ये कधी ना कधी पक्षांतर केल्याचं दिसून येत आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाचे ५ उमेदवार हे बाहेरून आले आहेत. तर दोन उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट आणि आता शरद पवार गट असा प्रवास केलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटानेही बाहेरून आलेल्या ५ जणांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसच्या उमेदवारांमधील तीन उमेदवार हे मागच्या काही वर्षांत पक्षांतर करून आलेले आहेत.
या यादीचा आढावा घ्यायचा झाल्यास, शिवसेना ठाकरे गटाने ज्या बाहेरून आलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे, त्यामध्ये संजय दिना पाटील ( ईशान्य मुंबई), वैशाली दरेकर (कल्याण), संजोग वाघोरे (मावळ), करण पवार (जळगाव) आणि संजय देशमुख (यवतमाळ-वाशिम) यांचा समावेश आहे. या उमेदवारांपैकी ईशान्य मुंबईतील उमेदवार संजय दिना पाटील हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार म्हणून निवडून आले होते. तर कल्याणधील ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर ह्यांनी आधी मनसेकडून लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे. ठाकरे गटाचे मावळमधील उमेदवार संजोग वाघोरे हे काही दिवसांपूर्वीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात होते. तिथून ते ठाकरे गटात आले. जळगावमधील ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार हेसुद्धा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपामधून ठाकरे गटात आलेले आहेत. त्यांनी भाजपाकडून पारोळ्याचं नगराध्यक्षपद भूषवलं होतं. याबरोबरच ठाकरे गटाचे यवतमाळ-वाशिममधील उमेदवार संजय देशमुख यांनी शिवसेनेतून राजकारणाची सुरुवात केल्यानंतर काँग्रेस, भाजपा असा प्रवास करत आता ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बाहेरून आलेल्या ज्या नेत्यांना पुन्हा किंवा नव्याने उमेदवारी दिली आहे. त्यामध्ये सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा (भिवंडी), श्रीराम पाटील (रावेर), अमर काळे (वर्धा), धैर्यशील मोहिते पाटील (माढा), अमोल कोल्हे (शिरूर), बजरंग सोनावणे (बीड), निलेश लंके (नगर) यांचा समावेश आहे. यापैकी शरद पवार गटाचे भिवंडीमधील उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा यांनी शिवसेना, मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि आता शरद पवार गट असा राजकीय प्रवास केलेला आहे. तर रावेरमधील शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील हे काही दिवसांपूर्वीपर्यंत भाजपात होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. शरद पवार गटाचे वर्धा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अमर काळे हेसुद्धा पक्षांतर करून आलेले आहेत. अमर काळे यांचं नाव काँग्रेसकडून चर्चेत होतं. मात्र, मतदारसंघ शरद पवार गटाला सुटल्याने त्यांना हातात 'तुतारी' घ्यावी लागली आहे. तसेच, शरद पवार गटाचे विद्यमान खासदार आणि शिरुरमधील उमेदवार डॉ. अमोल कोल्हे हे आधी शिवसेनेत होते. २०१९ मध्ये निवडणुकीच्या तोंडावर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले होते. आता त्यांना येथून पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. याशिवाय शरद पवार यांनी बीड आणि नगरमध्ये उमेदवारी दिलेले बजरंग सोनावणे आणि निलेश लंके हे अजितदादांची साथ सोडून शरद पवार यांच्याकडे आलेले आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने बाहेरून आलेल्या नेत्यांना फारशी संधी दिलेली नाही. काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये तीन उमेदवार हे मागच्या काही वर्षांमध्ये पक्षात आलेले आहेत. त्यामध्ये रवींद्र धंगेकर (पुणे), प्रतिभा धानोरकर (चंद्रपूर) आणि अभय पाटील (अकोला) यांचा समावेश आहे. यामधील काँग्रेसचे पुणे लोकभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर हे आधी शिवसेनेत होते. त्यानंतर मनसेमध्ये प्रवेश करून ते नगरसेवक बनले होते. तर नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी कसब्याची पोटनिवडणूक लढवली होती. तिथे त्यांचा विजय झाला होता. त्यानंतर आता काँग्रेसने त्यांना लोकसभेसाठी संधी दिली आहे. काँग्रेसच्या चंद्रपूरच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर ह्या पूर्वी शिवसेनेमध्ये होत्या. २०१९ मध्ये त्यांचे पती बाळू धानोरकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याही काँग्रेसमध्ये आल्या आणि वरोरा मतदारसंघातून आमदार बनल्या होत्या. तर काँग्रेसने अकोला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेले अभय पाटील हे संघाच्या पार्श्वभूमीमधून आलेले आहेत. त्यांचे वडील विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांताध्यक्ष होते.
दुसरीकडे महायुतीचा विचार केल्यास भाजपाने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी हिना गावित, सुजय विखे पाटील, संजयकाका पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, कपिल पाटील, नवनीत कौर राणा, भारती पवार, रामदास तडस आदी उमेदवार हे मागच्या काही वर्षांत इतर पक्षांमधून भाजपामध्ये आलेले आहेत.