विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आमने-सामने आल्याने यावेळची बारामती लोकसभा मतदार संघातील निवडणूक लक्षवेधी ठरत आहे. बारमतीमध्ये मंगळवार ७ मे रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी रविवारी संध्याकाळपर्यंत येथे अगदी चुरशीने प्रचार झाला. दरम्यान, निवडणुकीसाठीचा प्रचार आटोपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोपांना उधाण आले आहे. अजित पवार यांना निवडणुकीच्या प्रचारात गुंडांची मदत घ्यावी लागतेय, असा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तर त्याला अजित पवार गटामधून अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पवार हे स्वत:च एक गुंड असल्याचा टोला मिटकरी यांनी लगावला आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर रोहित पवार म्हणाले की, गुंडच जर अजित पवार यांचा प्रचार करत असतील तर त्यामधून येत्या काळात सामान्य लोकांचं नाही तर गुंडांचं सरकार भाजपाच्या नेतृत्वाखाली सत्तेवर येईल, असा संदेश दिला जात आहे. त्यामधून गुंडांचं साम्राज्य फार मोठ्या प्रमाणावर वाढेल. त्यामुळे मी लोकांना विनंती करतो की, तुम्ही मतदान करताना आपल्याला सामान्य लोकांचं सरकार आणायचं आहे की गुंडांचं हा विचार करावा, असं आवाहन रोहित पवार यांनी केलं.
आज जर गुंडच भाजपा आणि भाजपाच्या मित्रपक्षांचा प्रचार करत असतील तर गुंडांना सत्तेत असलेल्या लोकांचा वरदहस्त आहे, असा त्याचा अर्थ निघतो. उद्या जाऊन हेच गुंड आणि त्यांचे कार्यकर्ते आपल्या घरापर्यंत पोहोचतील, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
त्यानंतर रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांना अजित पवार गटाकडून अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जाणीवपूर्वक असं वातावरण खराब करण्याचं काम रोहित पवार करत आहेत. रोहित पवार हे स्वत:च एक गुंड आहेत. रोहित पवार यांच्यासोबत कोणकोण फिरत आहेत आणि बारामतीमध्ये हे काय चाळे करत आहेत, याचं उत्तर मी देणार आहे, असे अमोल मिटकरी म्हणाले.