यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राहुल गांधी आणि काँग्रेसने आघाडी उघडली आहे. तसेच राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला सातत्याने टीकेचं लक्ष्य करत आहेत. दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. काँग्रेस पक्ष देशभरात केवळ २४० जागांवरच लढतोय, मग त्यांचा पंतप्रधान कसा होणार? असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला आहे. तसेच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिवसा स्वप्नं पडू लागली आहेत, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.
आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसच्या नेत्यांना दिवसाही पंतप्रधान बनण्याची स्वप्नं पडत आहेत. जे २४० जागा लढवताहेत. ते कसे पंतप्रधान होऊ शकतात. ते कसे देशाचं नेतृत्व करू शकतात. बहुमतासाठी, पंतप्रधान बनण्यासाठी २७२ जागा निवडून याव्या लागतात, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने इंडिया आघाडीच्या माध्यमातून भाजपाला आव्हान दिले आहे. त्यामुळे आपला कमी प्रभाव असलेल्या राज्यात काँग्रेसने अधिकाधिक जागा ह्या मित्रपक्षांना सोडल्या आहेत. त्यामुळे बिहार, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यासारख्या मोठ्या राज्यांमधील १६८ जागांपैकी केवळ ४४ जागांवर काँग्रेस लढत आहे. त्याशिवाय दिल्ली, झारखंड, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही काँग्रेसने आपल्या मित्रांना अधिकाधिक जागा सोडल्या आहेत.