रोखठोक भूमिका मांडणाऱ्या आवाजाने सोडली काँग्रेसची साथ, काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 11:38 AM2024-04-09T11:38:06+5:302024-04-09T11:54:50+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: अनेक बडे नेते काँग्रेसची साथ सोडत असताना आज गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. प्रसारमाध्यमांसमोर काँग्रेसची बाजू रोखठोकपणे मांडणारे काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते राजू वाघमारे यांनी आज पक्षाची साथ सोडली असून, त्यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. 

Maharashtra Lok Sabha Election 2024: Congress spokesperson Raju Waghmare joined Shinde's Shiv Sena | रोखठोक भूमिका मांडणाऱ्या आवाजाने सोडली काँग्रेसची साथ, काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

रोखठोक भूमिका मांडणाऱ्या आवाजाने सोडली काँग्रेसची साथ, काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून काँग्रेसला दिल्लीपासून गल्लीपर्यंत हादरे बसत आहेत. अनेक बडे नेते काँग्रेसची साथ सोडत असताना आज गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. प्रसारमाध्यमांसमोर काँग्रेसची बाजू रोखठोकपणे मांडणारे काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते राजू वाघमारे यांनी आज पक्षाची साथ सोडली असून, त्यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. 

शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू वाघमारे म्हणाले की, काँग्रेस पक्षाची सध्याची स्थिती आणि काँग्रेस पक्षाची सध्या होत असलेली फरफट, एका राष्ट्रीय पक्षाची एका प्रादेशिक पक्षाने केलेली ससेहोलपट पाहता आणि काँग्रेस पक्षामधील काही नेत्यांच्या स्वार्थी आणि गलिच्छ राजकारणामुळे व्यथित होऊन मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

ते पुढे म्हणाले की,ज्या पद्धतीने काँग्रेस पक्ष काम करतोय, तसेच कुणाचाच कुणामध्ये नसलेला पायपोस, महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या हाताखाली दबलेला काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष काम करतोय का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे मुंबई उत्तर पश्चिमची जागा संजय निरुपम यांनी मागितली तेव्हा ती जागा मागू नये यासाठी त्यांच्यावर पक्षांतर्गत दबाव आणला गेला. त्यांना शेवटी पक्षातून बाहेर काढण्यात आलं. आज सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना टाचा घासाव्या लागत आहेत. ती जागा आपली असल्याचं रक्त आटवून सांगावं लागतंय, मात्र ठाकरेसेने तिथे उमेदवार जाहीर करून टाकला आहे. याच्यातून काँग्रेसची राज्यातील परिस्थिती काय आहे, हे दिसतंय, असा टोला राजू वाघमारे यांनी लगावला आहे. 

हीच परिस्थिती भिवंडी येथे आहे. तिथे शरद पवार यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार जाहीर करून टाकला आहे. काँग्रेसची किंमत संपलेली आहे हेच यातून दिसून येत आहे. याचा परिणाम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर होणं साहजिकच आहे. हा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात झाला आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसजन दु:खी आहेत, व्यथित आहेत. पुढे भवितव्य काय आहे हे त्यांना कळत नाही आहे. त्यांना ते भविष्य दाखवण्यासाठी आज गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मी शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे राजू वाघमारे यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: Congress spokesperson Raju Waghmare joined Shinde's Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.