जागावाटपावरून पेच, आघाडी धर्माची आठवण; भाजपाविरोधी INDIA आघाडीची घडी विस्कटणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 02:05 PM2024-03-28T14:05:12+5:302024-03-28T14:06:24+5:30
Loksabhe Election 2024: महाराष्ट्रात एप्रिल, मे या दोन महिन्यात ५ टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे अशा टप्प्यात मतदान होईल.
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून अद्यापही भाजपाविरोधी इंडिया आघाडी यांच्यात एकवाक्यता नाही. आधी पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीचं फिस्कटलं, त्यानंतर पंजाबमध्येही आघाडी तुटली आणि आता महाराष्ट्रात जागावाटपावरून आघाडीतील घटक पक्षांमधला तिढा सुटत नाही. बिहारमध्येही नाराजीचं वातावरण आहे. बुधवारी बिहार आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. ज्यामुळे इंडिया आघाडीत काही आलबेल नाही असं चित्र समोर दिसले. महाराष्ट्रात ५ तर बिहारमध्ये ४ टप्प्यात निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. याठिकाणी ६ जागांवर वाद आहे. जानेवारी ते मार्चपर्यंत ३ महिन्यात आघाडीने चर्चेद्वारे हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु एका जागेवर ३-३ दावेदार असल्याने एकमत झाले नाही. शिवसेना ठाकरे गटाने बुधवारी १७ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. ज्यामुळे काँग्रेस आणि शरद पवार गट नाराज झाला. आघाडी धर्माचे पालन करायला हवे होते. ठाकरेंनी एकतर्फी निर्णय घेतल्याने काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली. ज्या जागांवर वाद नाही अशा जागांवर काँग्रेसनं उमेदवार घोषित केलेत.
दक्षिण मध्य मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम, सांगली आणि भिवंडी या जागेवर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसमध्ये अद्याप तोडगा नाही. त्यात उद्धव ठाकरेंनी मुंबई दक्षिण मध्य जागेवर अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा केली आहे. ज्याठिकाणी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड इच्छुक आहेत. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकर यांना ठाकरेंनी उमेदवारी दिली तिथे काँग्रेसचे संजय निरुपम इच्छुक होते. सांगलीतून चंद्रहार पाटील यांना ठाकरेंनी उमेदवारी घोषित केली. जिथे विशाल पाटील काँग्रेसकडून प्रमुख दावेदार होते. भिवंडीच्या जागेवर शरद पवार आणि काँग्रेस दोघांनी दावा केला आहे.
महाराष्ट्रात एकूण ४८ जागा आहेत. मागील २०१९ च्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितने आणि ओवैसींच्या एमआयएमनं एकत्रित निवडणूक लढवली होती. परंतु केवळ एका जागेवर त्यांना विजय मिळाला. मात्र या युतीने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक जागा पडल्या. आता महाविकास आघाडी आणि महायुती, वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत अनेक मतदारसंघात पाहायला मिळेल. महाराष्ट्रात एप्रिल, मे या दोन महिन्यात ५ टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे अशा टप्प्यात मतदान होईल.