लोकसभा निवडणुकीसाठीचं महाराष्ट्रातील मतदान आटोपून आठवडा उलटला तरी नेतेमंडळींमधील आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. दरम्यान, राज्यातील काही मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप करत त्या ठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून करण्यात आली होती. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मतदान आटोपल्यानंतर १५-२० दिवसांनी फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद असल्याचा टोला सुनील तटकरे यांनी लगावला आहे.
शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले की, निवडणुका होत असताना ४० वर्षांच्या राजकीय जीवनात मीसुद्धा काही प्रसंग अनुभवले आहेत. फेरमतदानाची मागणी ही त्याक्षणी किंवा संध्याकाळी होते. अगदीच खूप काही झालं तर दुसऱ्या दिवशी होते. यंत्र बिघडली तर त्यावेळी ती केली जाते. १५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं याचा अर्थ निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे. हे स्पष्ट झाल्यानंतर या पद्धतीची मागणी केली जाते हे हास्यास्पद आहे, असा टोला सुनील तटकरे यांनी लगावला.
अलीकडे कुठेही बसून व्हिडिओ काढणे आणि प्रसारित करणे आणि जणू ते त्या प्रत्यक्ष स्थितीतील आहेत, अशा पद्धतीचा आभास निर्माण करणे, असे प्रकार आज ज्यांना फारसे काम उरले नाही ते करत आहेत. त्यांनी मागणी जरूर करावी, लोकशाहीत त्यांना तो अधिकार आहे. बीडचे मतदान होऊन पंधरा दिवस उलटले आणि फेरमतदानाची मागणी आता केली जात आहे. निवडणुकीत पराजय अधिक स्पष्ट झाल्याचे हे द्योतक आहे, असे सुनील तटकरे म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या जागांचं भाकित करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांनाही सुनील तटकरे यांनी टोला लगावला. पृथ्वीराज चव्हाण यांनी ४८- ० जागा येतील असे सांगायला हवे होते. त्यांचा इतका गाढा अभ्यास आणि महाराष्ट्रात त्यांची कर्तबगारी चार वर्षे महाराष्ट्राने पाहिली आहे. त्यामुळे चंद्र- सूर्य असेपर्यंत पृथ्वीराज चव्हाण राज्यात मुख्यमंत्री राहिले पाहिजेत, अशी महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची अपेक्षा आहे, असा टोला सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना लगावला.