‘पैसे मिळाले नाहीत का तुला? मिळाले नसतील तर...’, भरसभेत अजित पवार यांनी विचारलं आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 05:15 PM2024-05-09T17:15:39+5:302024-05-09T17:17:52+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबामध्ये पडलेल्या फुटीमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. येथे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाल्याने पवार कुटुंबातील दोन गटांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्या होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबामध्ये पडलेल्या फुटीमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. येथे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाल्याने पवार कुटुंबातील दोन गटांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्या होत्या. मात्र आता बारामतीमधील मतदान आटोपल्यानं पवार कुटुंबीय बऱ्यापैकी निवांत झाले आहेत. दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघातील एका प्रचारसभेत अजित पवार यांनी हलक्या फुलक्या वातावरणात केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं आहे.
त्याचं झालं असं की, एका प्रचारसभेत अजित पवार भाषण करत असताना अचानक स्पीकरमधून आवाज आला आणि अजित पवार यांच्या भाषणात व्यत्यय आला. तेव्हा अजित पवार म्हणाले की, काय रे बाबा, काय झालं तुला. पैसे मिळाले नाही की काय? मिळाले नसतील तर मी बिल देतो, पण घाबरू नको आणि असं काही करू नको, असं विधान अजित पवार यांनी केलं. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्यांमध्ये एकच हशा पिकला.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून लढणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला ५ जागा आल्या होत्या. त्यापैकी परभणीची जागा त्यांनी महादेव जानकर यांच्या पक्षाला सोडली होती. तर त्यांच्या पक्षाकडून लढवण्यात येत असलेल्या उस्मानाबाद, बारामती आणि रायगडच्या जागांवरील मतदान आटोपलं आहे. आता शिरूरच्या जागेवर अजित पवार गटाकडून लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.