भाजपाचे नेते नारायण राणे आणि ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत हे कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आमने-सामने आल्याने यावेळी या मतदारसंघातीन निवडणूक अटीतटीची होत आहे. दरम्यान, काल कणकवलीत झालेल्या प्रचारसभेमधून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला आता नारायण राणे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
कणकवलीच्या सभेतून उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर बोचरी टीका केली होती. उद्धव ठाकरे म्हणाले होते की, शुभ बोल रे नाऱ्या, अशी एक म्हण आहे. आता मी येतो म्हटल्यावर कसे येतात बघतो, अशी धमकी दिली होती. पण बघा मी येऊन उभा आहे. परत कसे जातात ते बघतो, अशीही धमकी दिली होती. पण तुम्ही आडवे याच. तुम्हाला गाडूनच पुढे जातो, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्या टीकेला नारायण राणे यांनी आता प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची काय औकात आहे? मी मनात आणलं तरी बरंच काही करू शकतो. उद्धव ठाकरे यांनी समोर यावं, त्यांना अंग हलवायला दिलं तर काहीही हरेन मी. उद्धव ठाकरे यांनी उभं आडवं करण्याची भाषा वापरू नये. तसेच माझ्या रस्त्यातही येऊ नये. पोलीस संरक्षण घेऊन मला धमक्या देऊ नका. तुमची इच्छा असली तर एक फोन करा, मी येईन, असे आव्हान नारायण राणे यांनी यावेळी दिले.
नारायण राणे यांना गाडून पुढे जाईन, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्याबाबत विचारले असता नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे मला गाडून कसले पुढे जातात. तुमची मर्यादा काय, तुमचे ५६ आमदार होते. त्यातले उरलेत १६, त्यातले आत्ता १० आमदार जातील. ५ खासदार होते त्यातील एकही निवडून येणार नाही. तुम्ही मला कशाला ओलांडून जाता, मीच तुम्हाला ओलांडून जातो की नाही ते बघा, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.
कोकण माझा आहे म्हणण्यावरूनही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले की, अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी कोकणाला काय दिलं? पाच पन्नास लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत का? मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली होती. त्यात उद्ध ठाकरे यांचं कर्तृत्व काय? उद्धव ठाकेंनी उगाच थापा मारू नयेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली.