कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे. येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात लढत अहोत आहे. त्यामुळे येथील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. आज सकाळपासूनच येथे मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. तर मतदान सुरू असतानाच महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. शिंदेगटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे नॉट रिचेबल झाले असून, त्यामुळे महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे.
किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. मात्र अखेरच्या क्षणी भाजपाने हा मतदारसंघ आपल्याकडे घेतल्याने किरण सामंत यांना माघार घ्यावी लागली होती. सामंत यांच्या माघारीनंतर भाजपाकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली होती.
नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर किरण सामंत प्रचारामध्ये तितक्याशा उत्साहाने सक्रिय दिसले नाहीत. त्यातच त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या कार्यालयावरील बॅनर हटवल्यानेही चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, आज मतदानाला सुरुवात झाल्यानंतर किरण सामंत हे नॉट रिचेबल झाल्याने खळबळ उडाली आहे. तसेच ऐन मतदानावेळी घडलेल्या या घडामोडींमुळे सामंत यांचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत.