जाहीर केलेल्या उमेदवाराला विरोध, इच्छुकांची नाराजी, बंडखोरी आणि मित्रपक्षातील नेत्यांकडून घेण्यात आलेली ताठर भूमिका यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील तिढा सोडवताना भाजपाच्या नाकी नऊ येत आहेत. एकीकडे धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी बंडखोरीची तुतारी फुंकल्यानंतर उत्तम जानकर यांनीही विरोधाचा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज याबाबत पुढाकार घेत उत्तम जानकर यांना नागपूरमध्ये बोलावून घेत चर्चा केली. मात्र फडणवीस यांच्या शिष्टाईनंतरही माढ्यातील तिढा कायम असल्याचं चित्र आहे. तसेच आपण आज संध्याकाळी कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय जाहीर करू, असे सांगत सस्पेन्स वाढवला आहे.
धैर्यशिल मोहिते पाटील हे भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेल्यानंतर उत्तम जानकर हेसुद्धा मोहिते पाटील यांना पाठिंबा देतील, अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे सावध झालेल्या भाजपाने हालचाली करून जानकर यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी उत्तम जानकर यांना नागपूरला येण्यासाठी विशेष विमानाची सोय करण्यात आली होती. तसेच उत्तम जानकर यांच्यासोबत माढ्यातील भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, शहाजीबापू पाटील आदी नेतेमंडळीही फडणवीस यांना भेटण्यासाठी नागपूरला गेले.
या चर्चेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उत्तम जानकर म्हणाले की, आज देवेंद्र फणडवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. मी आमच्या कार्यकर्त्यांचे काही प्रश्न फडणवीस यांच्यासमोर मांडले. आता मी आज संध्याकाळी कार्यकर्त्यांशी बोलून आपला निर्णय जाहीर करणार आहे, असे उत्तम जानकर यांनी सांगितले.