लोकसभा निवडणुकीसाठीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी आटोपले. असं असं तरी महाराष्ट्रातील काही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाही. उमेदवारी जाहीर न झालेल्या मतदारसंघांमध्ये मुंबईजवळील ठाणे लोकसभा मतदाररसंघाचाही समावेश आहे. ठाण्यामध्ये महायुतीची बऱ्या पैकी ताकद आहे. मात्र या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट आणि भाजपा या दोघांकडूनीह दावा करण्यात येत असल्याने येथील तिढा अद्याप सुटलेला नाही. दरम्यान, ठाण्यातील लोकसभेच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महायुतीला टोला लगावला आहे. इथे साक्षात नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज भरला तरीसुद्धा ही जागा राजन विचारे हे मोठ्या मताधिक्याने जिंकतील, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील जागेवरून महायुतीमध्ये निर्माण झालेल्या तिढ्यावरून टोला लगावताना सुषमा अंदारे म्हणाल्या की, काय तो एकदा उमेदवार ठरवून टाका. मात्र माझ्या माहितीप्रमाणे ठाण्याची जागा ही त्यांना मिळत नाही आहे, असं काहीसं चित्र आहे. त्यामुळे ज्यांची जागा निश्चित नाही, ज्यांचा उमेदवार निश्चित नाही. त्यांनी इथे येऊन विजयाच्या बाता मारणं हे आश्चर्यकारक आहे. आम्ही आधीही म्हटलंय आणि आताही सांगतोय, इथे साक्षात नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज भरला तरीसुद्धा ही जागा राजन विचारे हे मोठ्या मताधिक्याने जिंकतील,असा आम्हाला विश्वास आहे.
यावेळी सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदेगटावरही टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, असली नकलीचा काहीतरी खेळ सुरू आहे. मला वाटतं या निमित्ताने नकली लोक फार लवकर उघडे पडतात. कारण नकलींना दिल्लीत मुजरे आणि हुजरे केल्याशिवाय त्यांचं काहीच ठरत नाही. असो, काहीही असलं तरी जे दोन-तीन लोक कोट शिवून तयार आहेत. त्यातल्या कुणाला तरी सांगावं की तुमचे कोट नेटफ्लिक्सवर विकायची वेळ आली आहे, असा टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला.
दरम्यान, ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गट आणि महाविकास आघाडीकडून प्रचाराचा धुरळा उडताना दिसत आहे, तर अद्याप उमेदवार जाहीर न झाल्याने महायुतीचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत, लवकरात लवकर उमेदवार जाहीर करा, अशी मागमी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. दरम्यान महायुतीचा उमेदवार २ मे रोजी जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. उमेदवार जाहीर करण्यास जेवढा उशीर होईल, तेवढे प्रचाराला कमी दिवस मिळतील, अशी भीती कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.