यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी लढत ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाती प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. येथे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आव्हान उभे केले आहे. दरम्यान, बहिणीने भावाच्या घरी जास्त दिवस राहू नये, तिने तिच्या घरी जावे, असं विधान महादेव जानकर यांनी केलं होतं. त्याला आता सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.
जानकर यांनी केलेल्या या विधानाबाबत विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकेल. पण महाराष्ट्र सरकारने एक कायदा केला आहे की, राज्यातील आणि देशातील कुठल्याही मुलीला वडीलांच्या संपत्तीमध्ये ५० टक्के अधिकार आहे.
मागचे काही दिवस सुरू असलेल्या प्रचारामधून महाराष्ट्रात असलेला दुष्काळ, कांद्याच्या निर्यातीची समस्या, सोयाबीन, कापसाला किंमत नाही. दुधाला भाव नाही. त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भ्रष्टाचार वाढला आहे, त्यामुळे तमाम जनता त्रस्त असल्याचे दिसले, असे निरीक्षणही सुप्रिया सुळे यांनी नोंदवले.
महायुतीचे नेते ही लढाई सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नसून मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई आहे, असा दावा करत आहेत. त्याबाबत प्रतिक्रिया देताना माझ्यासाठी ही लढाई यूपीए विरुद्ध एनडीए अशी आहे. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्याविरोधातील आहे, असे सुप्रियाा सुळे यांनी सांगितले. तसेच या निवडणुकीत धनशक्तीचा वापर होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.