- बाळकृष्ण परबकोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे नारायण राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात लढत होत आहे. कोकणात होत असलेली ही लढत नारायण राणेंसोबतच शिवसेना शिंदे गटासाठीही प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांसोबत शिंदे गटाचे नेतेही नारायण राणेंच्या प्रचारामध्ये आघाडीवर दिसत आहेत. एकेकाळी राणेंशी राजकीय संघर्ष करणारे दीपक केसरकर हेही गावोगावी, वाडीवस्तीवर जाऊन महायुतीचे उमेदवार नारायण राणेंचा प्रचार करत आहेत. त्यामुळे कोकणातील राजकारणात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन नेत्यांमध्ये नेमकं मनोमीलन कसं झालं, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. आता हे मनोमीलन कसं झालं, यामागचा उलगडा स्वत: दीपक केसरकर यांनी 'लोकमत डॉट कॉम'शी बोलताना केला आहे. मुळात आमच्यात तो वाद नव्हताच. तो वाद हा काम करण्याच्या पद्धतीबाबत होता. या संघर्षानंतर नारायण राणे आणि माझी त्यानंतर जेव्हा पहिली भेट झाली. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की, ज्यावेळी जिल्ह्याच्या हिताचा विषय येईल. तेव्हा आपल्याला दोघांना एकत्र काम करावं लागेल. देवाच्या कृपेने पुन्हा एकदा ती वेळ आली, असे केसरकर यांनी सांगितले.
नारायण राणेंसोबत झालेला संघर्ष आणि आता झालेल्या मनोमीलनावरून दादा आणि भाईंमधील वाद कसा मिटला, असा प्रश्न विचारला असता, दीपक केसरकर यांनी सांगितलं की, आमचाही एकेकाळी वैचारिक संघर्ष झाला होता. पण कुठे संघर्ष संपवायचा आणि लोकांसाठी कसं एकत्र यायचं हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. मुळात आमच्यात तो वाद नव्हताच. तो वाद हा काम करण्याच्या पद्धतीबाबत होता. कुणामध्ये भांडणं होऊ नयेत, मारामाऱ्या होऊ नयेत इथपर्यंत तो विषय मर्यादित होता. एकेकाळी हा संवेदनशील मतदारसंघ होता. मागच्या दहा वर्षांत हा मतदारसंघाची संवेदनशील ही ओळख पटली आणि आता शांततेची संस्कृती इथे नांदत आहे, असे केसरकर म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, एखाद्या गोष्टीसाठी संघर्षही करावा लागतो. परंतु नारायण राणे आणि माझी त्यानंतर जेव्हा पहिली भेट झाली. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की, ज्यावेळी जिल्ह्याच्या हिताचा विषय येईल. तेव्हा आपल्याला दोघांना एकत्र काम करावं लागेल. देवाच्या कृपेने पुन्हा एकदा ती वेळ आली. यापूर्वीसुद्धा मागचे वर्ष दीड वर्ष आमचे जवळचे संबंध आहेत. विकासाची गोष्ट असेल तर ते मला सांगतात. मी त्यांना सांगतो. शेवटी राजकारण कुणासाठी असतं तर ते सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी असतं. आम्ही भांडत बसायचं आणि कोकणी माणसानं मागे जायचं. हे याच्यापुढे घडणार नाही. आम्ही एकत्र राहू आणि कोकणचा विकास करू, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.