फाळणीनंतर निर्वासितांचे पुनर्वसन करणारे खासदार, देवराव कांबळे यांच्यावर पं. नेहरूंनी सोपविली होती जबाबदारी
By भारत दाढेल | Published: April 4, 2024 09:58 AM2024-04-04T09:58:17+5:302024-04-04T09:59:03+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: पहिल्या लोकसभेत भारत-पाकिस्तान फाळणीनंतर उद्भवलेल्या अनेक प्रश्नांची मालिका समोर उभी होती. पाकिस्तानातून भारतात परतलेल्या निर्वासितांच्या पुनर्वसनाची जबाबदारी नांदेडचे पहिले खासदार देवराव कांबळे यांच्याकडे देण्यात आली होती.
- भारत दाढेल
नांदेड - पहिल्या लोकसभेत भारत-पाकिस्तान फाळणीनंतर उद्भवलेल्या अनेक प्रश्नांची मालिका समोर उभी होती. पाकिस्तानातून भारतात परतलेल्या निर्वासितांच्या पुनर्वसनाची जबाबदारी नांदेडचे पहिले खासदार देवराव कांबळे यांच्याकडे देण्यात आली होती. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी रिफ्युजी समितीवर खा. कांबळे यांची नियुक्ती केली होती, अशी आठवण खा. कांबळे यांचे धाकटे बंधू ॲड. मारोतराव कांबळे यांनी सांगितली.
अडीचशे रुपयांत लढवली होती निवडणूक
- सर्वसाधारण जागेवर काँग्रेसचे शंकरराव टेळकीकरी, तर राखीव जागेवर देवराव कांबळे यांना तिकीट मिळाले. त्यांच्या विरोधात शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे विदर्भातील कंत्राटदार गोविंदराव मेश्राम उभे होते.
- काँग्रेसचे नेते शंकरराव चव्हाण यांनी अण्णांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. त्यावेळी देवराव कांबळे यांनी खिशात अडीचशे रुपये घेऊन प्रचार केला होता. कधी पायी, तर कधी बैलगाडीने प्रवास करीत मिळेल ते खाऊन त्यांनी प्रचार केला होता.
स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली होती शिफारस
स्वातंत्र्यानंतर प्रथमच झालेल्या १९५२ च्या लोकसभा निवडणुकीत नांदेड हा द्विमतदारसंघ होता. सर्वसाधारण गटातून एक व अनुसूचित जातीमधून एक, असे दोन लोकप्रतिनिधी निवडून येणार होते.
काँग्रेसकडून राखीव जागेवर निवडणूक लढविण्यासाठी पाथरी, जि. परभणी येथील देवराव कांबळे यांना उमेदवारी मिळाली. मातंग समाजाचे देवराव कांबळे यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वामी रामानंद तीर्थ, पुरणमल लाहोटी, बाबासाहेब परांजपे यांच्या शिफारशीमुळे देवराव कांबळे यांना उमेदवारी मिळाली.