‘मविआ’ला महायुतीपेक्षा केवळ 1.18% मते जास्त, मात्र ३० जागा जिंकल्या, महायुती राहिली १७ वर
By यदू जोशी | Published: June 9, 2024 08:16 AM2024-06-09T08:16:54+5:302024-06-09T08:18:20+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा केवळ १.१८ टक्के मते अधिक मिळाली; पण आघाडीने ३० जागा जिंकल्या आणि युतीला १७ जागांवर समाधान मानावे लागले.
- यदु जोशी
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीलामहायुतीपेक्षा केवळ १.१८ टक्के मते अधिक मिळाली; पण आघाडीने ३० जागा जिंकल्या आणि युतीला १७ जागांवर समाधान मानावे लागले. महाविकास आघाडीला ४३.९१ तर महायुतीला ४२.७३ टक्के मिळाली आहेत. ‘भाजप’ला १ कोटी ४९ लाख ६६ हजार ५७७ मते मिळाली.
महाविकास आघाडीत सर्वाधिक मते मिळाली ती काँग्रेसला. त्याच्या अगदी खालोखाल आहे ती उद्धवसेना. महायुतीमध्ये सर्वात जास्त मते मिळाली ती भाजपला. त्या खालोखाल शिंदेसेना राहिली. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना १० टक्क्यांपेक्षा अधिक मते आहेत. महायुतीत भाजप आणि शिंदेसेनेला १० टक्क्यांहून अधिक मते आहेत. अजित पवार गट ३.६० टक्क्यांपर्यंतच पोहोचू शकला. सर्व पक्षांमध्ये चांगला स्ट्राईक रेट हा शरद पवार गटाचा राहिला. १० जागा लढून त्यांनी ८ जिंकल्या.
राज्यातील प्रमुख पक्षांमध्ये सर्वाधिक जागा लढविणाऱ्या भाजपला सर्वाधिक मतेदेखील मिळाली. भाजपने २८ जागा महायुतीमध्ये लढविल्या होत्या आणि त्यांना २६.१८ टक्के मते मिळाली. काँग्रेसने १७ जागा लढविल्या आणि १३ जिंकल्या. काँग्रेसला १६.९२ टक्के मते मिळाली. भाजपने २८ जागा लढविल्या असल्या तरी केवळ ९ जिंकल्या, १९ जागा गमावल्या.
कोणत्या पक्षाचा कसा राहिला स्ट्राईक रेट ?
- भाजपपेक्षा काँग्रेसचा स्ट्राईक रेट फारच चांगला राहिला. केवळ ४ जागा त्यांनी गमावल्या.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिंदेसेनेने १५ जागा लढल्या आणि ७ ठिकाणी ते निवडून आले. शिंदेसेनेला १२.९५ टक्के मते पडली.
-उद्धवसेनेने २१ जागा लढवून ९ जिंकल्या. या पक्षाला १६.७२ टक्के मते मिळाली. काँग्रेस आणि उद्धवसेनेला जवळपास सारखी मते मिळाली.
-शरद पवार गटाने महाविकास आघाडीत १० जागा लढल्या आणि ८ जिंकल्या. या पक्षाला १०.२७ टक्के मते मिळाली. अजित पवार गटाने ४ जागा लढविल्या आणि एक जिंकली. या पक्षाला ३.६० टक्के मते मिळाली.
-एमआयएमला ०.६१, बसपाला ०.७३, भाकपला ०.०१, माकपला ०.०३, नोटा ०.७३, इतर ११.२३ असे मतदान झाले.