‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 09:05 AM2024-05-02T09:05:26+5:302024-05-02T09:08:28+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपाने अब की बार ४०० पार असा नारा देत प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र ही घोषणा आता भाजपासाठी (BJP) अडचणीची ठरताना दिसत आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती (Sambhaji raje Chhatrapati) यांनीही ४०० पारच्या दाव्यावरून भाजपावर टीका केली आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने अब की बार ४०० पार असा नारा देत प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र ही घोषणा आता भाजपासाठी अडचणीची ठरताना दिसत आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने मोदींना ४०० हून अधिक जागा ह्या संविधानामध्ये बदल करण्यासाठी हव्या असल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. तसेच हा दावा खोडून काढताना मोदी आणि भाजपाची दमछाक होत आहे. दरम्यान, काँग्रेसचेकोल्हापूरचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेमध्ये युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी ४०० पारच्या दाव्यावरून भाजपावर टीका केली आहे.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, तुम्ही कधी विचार केलाय की चारशे पार म्हणजे काय? चारशे पार ही धोक्याची घंटा आहे. ते २७२ का म्हणत नाहीत? ५४३ खासदारांमध्ये निम्मं करा ना तुम्ही? म्हणजे २७२ होतात. ठीक आहे २७२ म्हणायला अवघड होतं मग ३०० म्हणा. पण ४०० का? ४०० पार म्हणजे संविधान त्यांना बदलून टाकायचं आहे. त्यांना कायदा दुरुस्ती नाही तर कायदा बदलायचा आहे, असा घणाघाती आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला.
दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यापासून उद्धव ठाकरेंपर्यंत सर्व नेत्यांनी ४०० पारची घोषणा आणि संविधान बदलण्यावरून मोदी आणि भाजपाला घेरले आहे. तसेच भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सत्ता आल्यास राज्यघटना बदलण्याची आणि ते संपविण्याची योजना आखली आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.