'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 10:38 AM2024-05-01T10:38:35+5:302024-05-01T11:12:54+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आमने सामने आल्याने पवार कुटुंबामधील सत्तासंघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. यादरम्यान, अजित पवार यांनी त्यांचे काका शरद पवार यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.
अजित पवार यांनी बंडखोरी करून महायुतीमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबीयांमध्ये उभी फूट पडली होती. आता लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आमने सामने आल्याने पवार कुटुंबामधील सत्तासंघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्याबाजूने एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी त्यांचे काका शरद पवार यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. एकेकाळी मी शरद पवार यांना दैवत मानायचो, मात्र आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे, असं विधान अजित पवार यांनी केलं आहे.
आज पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी केलेल्या विधानाबाबत प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, शरद पवार हे एक वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी केलेल्या विधानाबाबत बोलावं एवढा मी मोठा नाही. एकेकाळी मी त्यांना दैवत मानत होतो. आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
यावेळी नाशिक मतदारसंघात निर्माण झालेल्या तिढ्याबाबत विचारले असता अजित पवार यांनी, नाशिक लोकसभा मतदारसंघा संदर्भात आमची चर्चा सुरू आहे, तिथून योग्य तो निर्णय होईल, असे सांगितले. तसेच शिरूर, बारामतीमध्ये लोकांना धमक्या दिल्या जाताहेत, या संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाबाबत विचारले असता अजित पवार यांनी त्या व्यक्तीच्या विधानाबाबत मला बोलायचे नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.