- राजेश मडावी चंद्रपूर - काहीही करून सत्तेला चिकटून राहणारे, कोलांटउड्या मारत नैतिकतेचा आव आणणारे नेते आज खूप वाढले. अशा अस्वस्थ वर्तमानात १९६२च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेले तत्कालीन चांदा (चंद्रपूर)चे अपक्ष दिवंगत खासदार लाल श्याम शाह हे फक्त एकच दिवस सभागृहात गेले आणि राजीनामा दिला. कोण होते लाल श्याम शाह, त्यांनी राजीनामा कशासाठी दिला, त्याची तशीच प्रेरक कहाणी आहे.
कोण होते लाल श्याम शाह?- १ मे १९१९ रोजी तत्कालीन मध्य प्रदेशात लाल श्याम शाह यांचा जन्म झाला. ते चांदा (चंद्रपूर) क्षेत्रातील पानाबरसचे जमीनदार व चौकी विधानसभा क्षेत्राचे आमदार होते. जानेवारी १९५६ला त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. - शाह यांनी १९५७ मध्ये चांदा लोकसभा निवडणूक लढविली. परंतु, काँग्रेसचे ॲड. व्ही. एन. स्वामी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. - १९६२च्या निवडणुकीत ॲड. स्वामींचा पराभव करून ते खासदार झाले. ५ सप्टेंबर १९६२ला त्यांनी खासदार म्हणून शपथ घेतली व एप्रिल १९६४ला त्यांनी राजीनामा दिला. - दिल्लीचे ज्येष्ठ संपादक व अभ्यासक सुदीप ठाकूर यांनी लिहिलेले लाल श्याम शाह यांचे हिंदी चरित्र २०१८ मध्ये प्रकाशित झाले आणि त्यांच्या राजीनाम्याचे ऐतिहासिक कारण अभ्यासकांसमोर आले.
राजीनामा देण्याचे कारण काय? लाल श्याम शाह हे जल, जंगल व जमिनीच्या लढाईचे शिलेदार होते. सीमांकन होऊन चांदा मतदारसंघ मध्य प्रदेशातून मुंबई राज्यात आला. १९६२ मध्ये ते चांद्यातून खासदार झाले. त्याचवेळी पूर्व पाकिस्तानातून बांगला निर्वासितांना दंडकारण्यात आणण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली.स्थानिक आदिवासींचे प्रश्न अत्यंत बिकट असताना केंद्र सरकार दंडकारण्यावर नवी आपत्ती का लादत आहे, असा लाल श्याम शाह यांचा सवाल होता. अखेर प्रचंड अस्वस्थ झालेल्या शाह यांनी लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष सरदार हुकूमसिंग यांनाचांदा येथील धर्मराव बंगल्यातून राजीनामा लिहिला. लोकसभा अध्यक्ष सरदार हुकूमसिंग यांनी २४ एप्रिल १९६४ला राजीनामा मंजूर केला. हा राजीनामा सुदीप ठाकूर लिखित चरित्रग्रंथात उपलब्ध आहे.
राजीनाम्यात काय म्हटले?‘मी सरकारला कोणतीही गोष्ट करण्यासाठी भाग पाडू शकत नाही; पण या सगळ्या बाबींवर नव्या पद्धतीने विचार करण्याची विनंती करू शकतो. यासाठी माझा हा राजीनामा आहे.’