- समीर देशपांडे कोल्हापूर - राज्यात भाजपला पाठिंबा दिलेले आमदार प्रकाश आवाडे हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ताराराणी पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणार आहेत. तशी घोषणा त्यांनी आणि त्यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषदेत केली.
आवाडे यांच्या या उमेदवारीच्या निर्णयामुळे हातकणंगले मतदारसंघातील राजकीय गणिते बिघडण्याची शक्यता आहे. प्रकाश आवाडे म्हणाले सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राजकीय स्थिती पाहता अतिशय अटीतटीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल आवाडे यांनी स्वतंत्र सर्वे केला असता यामध्ये माझ्या नावाला चांगली पसंती असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार आपण स्वतः हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहोत. निवडून येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याची आपली भूमिका आहे. तसेच खासदार कसा असावा, खासदार काय करू शकतो हे मी दाखवून देणार आहे. आपली याबाबत कोणाशीही चर्चा झालेली नसून सध्याच्या परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. माझी उमेदवारी भाजप पुरस्कृत नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.