‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 04:21 PM2024-05-16T16:21:01+5:302024-05-16T16:24:27+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यासाठी बसावे. निदान पोपटाच्या नादाने तरी काहीजण तुमच्यावर विश्वास ठेवतील, असा टोला अजित पवार गटाने लगावला आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महायुतीला १५ ते १६ तर महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागा मिळतील, तसेच अजित पवार गटाचा एकही खासदार जिंकून येणार नाही, असा दावा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने प्रत्युत्तर दिलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यासाठी बसावे. निदान पोपटाच्या नादाने तरी काहीजण तुमच्यावर विश्वास ठेवतील, असा टोला अजित पवार गटाने लगावला आहे.
अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले की, राज्यात महायुतीला १५-१६ जागा मिळतील तर मविआला ३०-३५ जागा मिळतील अशी भविष्यवाणी पृथ्वीराज चव्हाण यांनी काही वर्तमानपत्रात केली आहे. तशीच शरद पवार आणि रोहित पवार यांनीही भविष्यवाणी केली आहे. राज्यात निवडणूकीचे सर्व टप्पे पूर्ण झालेले नाहीत त्यामुळे अशी भविष्यवाणी करून पुढच्या मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पवारसाहेबांकडे दीर्घ अनुभव आहे त्यामुळे त्यांच्याबाबत बोलणार नाही. परंतु पृथ्वीराज चव्हाण हे फक्त राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत म्हणून टीव्हीवर काहीप्रमाणात टीआरपी मिळतो. पण त्यांना राज्यासंदर्भात बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. राजकारणावर भाष्य करावे एवढी उंचीही त्यांची नाही. ज्या विधानसभेत ते नेतृत्व करतात त्यांना त्यांच्याकडे स्वतःची ग्रामपंचायतदेखील नाही हे केवढे मोठे दुर्दैव आहे, अशी टीका उमेश पाटील यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, अजित पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार की नाही, हे मतदार ठरवतील. ४ जूनला त्याचा निकालही येईल. अहो अजित पवार यांच्या पाठीशी ४०-५० आमदार आहेत. पण पृथ्वीराज चव्हाण तुमच्यासोबत किती आमदार आहेत? कॉंग्रेसचा एकही आमदार त्यांच्या पाठीशी नाही. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचे भाष्य माध्यमांनी किती गांभीर्याने घ्यावे याचादेखील विचार करावा, असा टोलाही उमेश पाटील यांनी लगावला.
पृथ्वीराज चव्हाण यांनी एकतर पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यासाठी बसावे. निदान पोपटाच्या नादाने तरी काहीजण तुमच्यावर विश्वास ठेवतील असा टोला लगावतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाष्य करण्याच्या भानगडीत पडू नये असा इशारा दिलाच शिवाय आधी आपली सार्वजनिक जीवनातील पत किती आहे हे तपासून पाहावे, अशी टीकाही उमेश पाटील यांनी केली.
अजित पवार नॉटरिचेबल असले की ते नाराज आहेत अशाच बातम्या माध्यमांमध्ये दाखवल्या जातात. पण ते नॉटरिचेबलही नाही आणि नाराजही नाहीत. अजित पवार यांना निवडणुकीच्या कार्यकाळात घशाचे इन्फेक्शन झाले असल्याने डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितले आहे. मात्र ते उद्यापासून प्रचारात सहभागी होतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेमधून दिली.