शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यांपैकी एक असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे छत्रपती उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाते शशिकांत शिंदे यांच्यामध्ये लढत होत आहे. २०१९ च्या पोटनिवडणुकीत शरद पवार यांनी भर पावसात घेतलेल्या सभेनंतर उदयनराजे यांना पराभवाचा धक्का बसला होता. आता पुन्हा एकदा त्या निकालाची पुनरावृत्ती करण्यासाठी शरद पवार यांनी कंबर कसली आहे. यादरम्यान, सातारा मतदारसंघातील एका प्रचारसभेला संबोधित करताना शरद पवार यांनी उदयनराजेंवर बोचरी टीका केली आहे. कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका करताना शरद पवार म्हणाले की, छत्रपती उदयनराजेंबाबत काय बोलायचं, कॉलर उडवतात हे ठीक, पण कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ आहे हे पाहावं लागतं. त्यामुळे त्यांच्याबाबत अधिक काही बोलण्याची गरज नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
आम्ही गादीचा सन्मान करतो, पण मत देताना गादीला मत द्यायचं नाही. तर त्या ठिकाणी कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून शशिकांत शिंदे यांना मत देऊन त्यांचा सन्मान आपण मतांच्या रूपानं करू, असे आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केले.
उदयनराजे यांनी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात मोदी लाट असतानाही सातारा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शरद पवार यांनी आपल्या पक्षाकडून श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्या निवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव झाला होता.