राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने सामने आले आहेत. विशेषत: बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये अटीतटीची लढत होत आहे. दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार यांच्यात आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगली असून, दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. आज फोडाफोडीच्या राजकारणावरून अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी, आम्ही केली की गद्दारी? असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे.
शरद पवार यांनी केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीका करताना अजित पवार म्हणाले की, १९७८ मध्ये वसंतदादांसोबत काय घडलं त्याबाबत संजयभैय्या बोललेत. वसंतदादा शेतकऱ्यांचे लोकप्रिय नेते होते. त्यांच्या नेतृत्वात सरकारचं कामकाज सुरू होतं. मात्र ते सरकार पाडलं गेलं. मग जनता पक्षाला घेऊन सरकार स्थापन केलं. त्यावेळी शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाणांचं ऐकलं नाही. ज्यांनी संधी दिली त्यांचंही ऐकलं नाही, असे अजित पवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीस २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मी मुंबईला पोहोचेपर्यंत प्रफुल्ल पटेल यांनी भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा आहे, असं जाहीर केलं. मी म्हटलं हे कसं काय झालं, तर मला म्हणाले ही आपली स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे ह्यांनी केलं की स्ट्रॅटेजी मी केली की गद्दारी. मी केलं की वाटोळं, असं विधान अजित पवार यांनी केलं.