बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या पवार कुटुंबामधील दोन सदस्यांमध्येच लढत होत आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्याकडून होत असलेल्या टीकेला यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी राजकारणात तुम्हा सगळ्यांची सेवा आणि या देशात पॉलिसी मेकिंग करण्यासाठी आले आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी राजकारणात तुम्हा सगळ्यांची सेवा आणि या देशात पॉलिसी मेकिंग करण्यासाठी आले आहे. माझ्या माध्यमातून तुमच्या जीवनात एक चांगला बदल व्हावा यासाठी मी राजकारणात आले आहे.
यावेळी आपल्यावर टीका करणाऱ्या अजित पवार आणि इतर विरोधकांनाही सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला. त्या म्हणाल्या की, १८ वर्षे आम्ही एकत्र काम केलं. आता वेगळे होऊन सहा महिने झाल्याने साडे १७ वर्षे म्हणा. पण आज लोकं टीका करताना माझ्यामधील असे असे गुण सांगतात, जे मागच्या साडे सतरा वर्षांत मला कधी माहितीही नव्हते. माझ्यामध्ये एवढे वाईट गुण होते, तर एवढी वर्षे गप्प का बसलेत, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला.
दरम्यान, १७ वर्षांनंतर आता आमच्या डोक्यात प्रकाश पडला आहे, असं विधान अजित पवार यांनी केलं होतं. त्याबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी लोकांना बोलण्याचा अधिकार आहे, असं थोडक्यात उत्तर दिलं.