‘त्या’ जागांवर ‘वंचित’चा प्रभाव, ‘मविआ’ला जाणार जड? राज्यात सेट बॅक बसण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 11:59 AM2024-04-01T11:59:07+5:302024-04-01T12:00:33+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीत समावेशापासून वंचित बहुजन आघाडी दूर राहिल्याने गेल्या २०१९ च्या निवडणुकीत ‘वंचित’मुळे घडून आलेले मत विभाजन व आघाडीला बसलेल्या फटक्याच्या आकडेवारीकडे लक्ष वेधले जात आहे.
- राजरत्न सिरसाट
अकाेला - महाविकास आघाडीत समावेशापासून वंचित बहुजन आघाडी दूर राहिल्याने गेल्या २०१९ च्या निवडणुकीत ‘वंचित’मुळे घडून आलेले मत विभाजन व आघाडीला बसलेल्या फटक्याच्या आकडेवारीकडे लक्ष वेधले जात आहे. गेल्यावेळी ‘वंचित’च्या स्वतंत्र वाटचालीमुळे काँग्रेस आघाडीला साधारण सात जागांवर फटका बसला होता.
२०१९ च्या लाेकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. वंचित बहुजन आघाडीला सोबत न घेऊ शकल्याने काँग्रेस आघाडीला मोठा फटका बसल्याचे समाेर आले हाेते. ‘वंचित’च्या १५ जागांवरील उमेदवारांना ९० हजार ते तीन लाखांपर्यंत मते मिळाली हाेती आणि जवळपास सात ठिकाणी ‘वंचित’च्या उमेदवारांनी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना विजयापासून दूर ठेवले. ॲड. प्रकाश आंबेडकर आणि ‘एआयएमआयएम’ यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या वंचित बहुजन आघाडीला जवळपास १४ टक्के मते मिळाली आणि छत्रपती संभाजीनगर येथून एक खासदारकीही मिळाली.
कुठल्या मतदारसंघात किती मिळाली होती मते?
नांदेड : ‘वंचित’चे यशपाल भिंगे यांनी १ लाख ६६ हजार १९६ मते घेतली. काँग्रेसचे अशाेक चव्हाण यांचा केवळ ४० हजार १४८ मतांनी पराभव झाला हाेता.
बुलढाणा : राष्ट्रवादीचे डाॅ. राजेंद्र शिंगणे यांचा १,३३,२८७ मतांनी पराभव झाला हाेता. वंचितचे बळीराम सिरस्कार यांनी १,७२,६२७ मते घेतली हाेती.
गडचिरोली-चिमूर : काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांचा ७७,५२६ मतांनी पराभव झाला. ‘वंचित’चे रमेश गजबे यांना १ लाख ११ हजार ४६८ मते मिळाली हाेती.
परभणी : काँग्रेसचे राजेश विटेकर यांचा ४२,१९९ मतांनी पराभव झाला हाेता. वंचितचे आलमगीर खान यांना १,४९,९४६ मते मिळाली हाेती.
सोलापूर : काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांचा १,५८,६०८ मतांनी पराभव झाला हाेता. ‘वंचित’चे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी १ लाख ७० हजार ७ मते घेतली हाेती.
हातकणंगले : स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचा ९६ हजार ३९ मतांनी पराभव झाला हाेता. ‘वंचित’चे अस्लम सय्यद यांना १ लाख २३ हजार ४१९ मते पडली हाेती.
सांगली : काँग्रेसचे विशाल पाटील यांचा १,६४,३५२ मतांनी पराभव झाला हाेता. ‘वंचित’चे गाेपीचंद पडळकर यांना ३ लाख २३४ मते मिळाली हाेती.
...म्हणून वंचितच्या ताकदीचा धसका; ३९ जागांवर तिसऱ्या क्रमांकाची मते
मुंबई : राज्यात बदललेल्या समीकरणानंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीची भूमिका निर्णायक ठरणार आहे. २०१९ मधील निवडणुकीत तब्बल ३९ जागांवर तिसऱ्या स्थानी राहिलेल्या वंचितने आपली ताकद दाखवून दिली होती.