यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर प्रखर शब्दात बोचरी टीका करत आहेत. उद्धव ठाकरे यांना भाजपा नेत्यांकडूनही त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं जात आहे. दरम्यान, आता या आरोप-प्रत्यारोपांच्या लढाईत भाजपा नेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नारायण राणे यांनीही उडी घेडली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना इशारावजा धमकी दिली आहे. सिंधुदुर्गात येऊन आमच्या नेत्यांवर टीका केली तर परत जायचा रस्ता कुठून जातो हे मी दाखवतो, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना नारायण राणे म्हणाले की, तू आता इकडे येतोयस तर ये. पण असले शब्द सिंधुदुर्गात बोलले तर परत जायचा रस्ता कुठून जातो हे मी दाखवतो. आमचे नेते नरेंद्र मोदी असोत, अमित शाह असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत, आमच्या नेत्यांनी तुमच्यासारखं सगळं सोडलेलं नाही, असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला.
यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीवरही टीका केली. उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. पण केवळ दोन दिवस मंत्रालयात गेले. या कोकणाला काही दिलं नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपाने नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आलेले खासदार विनायक राऊत यांचे आव्हान आहे. विनायक राऊत यांनी २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांचा पराभव केला होता.