पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज कोल्हापुरात होत असलेल्या प्रचारसभेवरून आज महायुती आणि महाविकसा आघाडीच्या नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगली आहे. त्यात ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरी टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे शाहूंच्या विरोधात प्रचारासाठी कोल्हापुरात आले होते हे महाराष्ट्राची जनता कधीच विसरणार नाही, भाजपा छत्रपतींच्या गादीचा अपमान करत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्या टीकेला आता भाजपा नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोल्हापूरचा निकष लावत असाल तर साताऱ्यामध्ये उदयनराजेंविरोधात महाविकास आघाडीचे नेते प्रचार का करत आहेत, असा सवाल नितेश राणे यांची विचारला आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या विधानाला प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, कोल्हापूरचा निकष लावत असाल तर महाविकास आघाडीचे नेते साताऱ्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविरोधात का प्रचार करत आहेत. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, हा संजय राऊतांचा खोटा गुण आहे. याच संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागितले होते. त्या कृतीसाठी संजय राऊत यांनी आधी माफी मागितली पाहिजे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापुरात होत असलेल्या सभेबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले होते की, ज्या शाहू महाराजांनी राज्य आणि देशाला पुरोगामी विचार दिला. जे शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी येताहेत हे ऐकून मला अजिबात धक्का बसला नाही. छत्रपती शाहू आणि त्यांच्याआधीचे सगळे या गादीचे वारसदार यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोठं योगदान आहे. त्यामुळे भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांनी कोल्हापूरमधून उमेदवार उभं करणंच चूक आहे. छत्रपती शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्यावं आणि महाराष्ट्रातील शाहू, फुले, आंबेडकरांच्या परंपरेचा सन्मान करावा, अशी आमची इच्छा होती. कोल्हापूरची जागा शिवसेनेची होती. तरी आम्ही शाहू महाराज निवडणुकीला उभे राहताहेत हे ऐकल्यावर ती जागा त्यांच्यासाठी सोडली. पण भाजपाकडून नरेंद्र मोदी हे शाहूंच्या विरोधामध्ये प्रचार करण्यासाठी येताहेत. नरेंद्र मोदी हे शाहूंच्या विरोधात प्रचारासाठी कोल्हापुरात आले होते हे महाराष्ट्राची जनता कधीच विसरणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला होता.