सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात सुरू असलेल्या वादाला आता वेगळं वळण मिळालं आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्यानंतर येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेले काँग्रेसचे नेते विशाल पाटील हे नाराज झाले. तसेच त्यांना पक्षाच्या स्थानिक संघटनेकडूनही साथ मिळाली. दरम्यान, विशाल पाटील यांनी सांगलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून ते अपक्ष आणि काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार आणि सांगलीमधील नेते विश्वजित कदम यांनी मोठं विधान केलं आहे.
विश्वजित कदम म्हणाले की, सांगली लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रात चर्चेत राहिला आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काल मला तातडीने बोलावलं होतं. त्यावेळी सांगलीचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत आणि इतर सर्वांची पटोले आणि थोरात यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. तसेच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्याशीही माझं बोलणं झालं. या चर्चेत मी सांगलीमध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे, ती त्यांच्यासमोर मांडली. तसेच या संदर्भात लवकरात लवकर एक संयुक्त मार्ग काढावा ज्यामुळे राज्यातील आणि सांगलीतील महाविकास आघाडीसंदर्भात एक ठोस पाऊल उचलता येईल, असे मी त्यांना सांगितले.
विश्वजित कदम पुढे म्हणाले की, विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म भरलेला नाही. मात्र कुठल्याही पक्षाचा एबी फॉर्म हा शेवटच्या क्षणापर्यंत जोडता येऊ शकतो. त्यासाठी १९ एप्रिल रोजी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. माझ्या माहितीप्रमाणे विशाल पाटील यांनी दोन उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यातील एक अर्ज काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून आणि दुसरा अपक्ष उमेदवार म्हणून भरला आहे. सांगलीबाबतच्या निर्णयामध्ये आता बदल होईल की नाही हे मी सांगत नाही. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले आता पुढील जबाबदारी ही काँग्रेसच्या राज्य आणि दिल्लीतील नेतृत्वाची आहे. सांगलीबाबत आम्हाला राज्य आणि देशातील काँग्रेसच्या नेत्यांनी साथ दिली. मात्र सांगतील काय परिस्थिती निर्माण झाली त्याचे सगळे साक्षीदार आहेत. त्याची पुनरावृत्ती मी करत नाही. महाविकास आघाडी महाराष्ट्रात अबाधित राहिली पाहिजे. महाराष्ट्रातील वातावरण महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहे. यादृष्टीने आता येणाऱ्या काळात काय पावलं टाकली पाहिजेत, हे आता आमच्या महाराष्ट्रातील आणि देशातील ज्येष्ठांनी ठरवलं पाहिजे, असं विश्वजित कदम म्हणाले.
विशाल पाटील यांना वंचितचा पाठिंबा मिळण्याबाबत मिळण्याबाबत विश्वजित कदम म्हणाले की, सध्या राज्यात वंचितचे अनेक प्रयोग सुरू आहेत. या प्रयोगामध्ये काय काय घडतं हे अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत ठरेल. मी काय त्याबाबत फार बोलणार नाही. राहता राहिला प्रश्न अपक्ष लढण्याचा तर त्याबाबत आम्ही जिल्ह्यातील परिस्थिती मांडली आहे. आता त्यावर राज्यातील आणि देशातील वरिष्ठ आमच्याशी बोलून मार्ग काढतील, अशी अपेक्षा आहे, असेही विश्वजित कदम यांनी सांगितले.