- बाळकृष्ण परबयंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघातील लढतींवर राजकीय वर्तुळाचं सर्वाधिक लक्ष राहणार आहे, त्यामधील एक लढत ही कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात रंगणार आहे. महायुतीमधील जागावापाचा तिढा सोडवून भाजपाने येथून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केल्याने येथे आजी-माजी शिवसैनिकांमध्ये जुगलबंदी रंगणार, हे आता निश्चित झाले आहे. त्यातच नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वैर सर्वश्रुत असल्याने या लढतीमधील तीव्रता आणखीच वाढणार आहे. एवढंच नाही तर, २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांचा दारुण पराभव केला होता. त्यामुळे आता नारायण राणे हे मुलाच्या पराभवांचा वचपा काढणार की दोन वेळा निलेश राणेंचा पराभव करणारे विनायक राऊत आता नारायण राणेंचा हरवून विजयाची हॅटट्रिक करणार, याबाबत सध्या उत्सुकता निर्माण झाली आहे.
आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील पक्षीय बलाबल पाहायचं झाल्यास येथील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सावंतवाडी-वेंगुर्ला आणि रत्नागिरी या दोन मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. तर मालवण-कुडाळ आणि राजापूर या दोन मतदारसंघात ठाकरे गटाचे आमदार आहेत. चिपळूण मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे. तर केवळ कणकवली या एकमेव विधानसभा मतदारसंघात भाजपाचा आमदार आहे. एकूणच येथे महायुतीचे ४ आणि ठाकरे गटाचे २ आमदार असं बलाबल आहे. त्याबरोबरच सिंधुदुर्गातील बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांवर नारायण राणेंचं वर्चस्व आहे. तर या मतदारसंघात रत्नागिरीचा जो भाग येतो, तिथे उदय सामंत यांचं काही प्रमाणात वर्चस्व आहे. त्यामुळे सध्या कागदावर तरी नारायण राणे यांची ताकद विनायक राऊत यांच्यापेक्षा अधिक आहे. मात्र असं असलं तरी, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत स्थानिक पातळीवर ठाकरे गटाची ताकद बऱ्यापैकी आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरही त्यात फार मोठी घट झालेली नाही, याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मात्र, महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची ताकद मात्र इथे अगदीच नगण्य आहे. त्यामुळे यंदाची रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील लढत राणे विरुद्ध ठाकरे गट यांच्यातच होणार आहे.
सामान्य शिवसैनिक म्हणून राजकीय प्रवासाची सुरुवात करत पुढे नगरसेवक, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशी वाटचाल करणाऱ्या नारायण राणेंच्या राजकारणाच्या दृष्टीने ही लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक ठरणारी आहे. एके काळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खास मर्जीतील व्यक्ती बनून सिंधुदुर्गासह महाराष्ट्राचं राजकारण गाजवणाऱ्या नारायण राणे यांनी २००५ साली बाळासाहेबांच्या हयातीतच शिवसेनेत बंड केलं होतं. त्यानंतर, त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून दक्षिण कोकणातून शिवसेनेला नामशेष करून टाकलं होतं. तेव्हा राणेंचा झंझावात एवढा होता की, पोटनिवडणुकीच्या प्रचारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मालवणी मतदारांसमोर हात जोडून लोटांगण घातल्यानंतरही शिवसेनेच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं होतं. मात्र, काही वर्षांतच ही परिस्थिती बदलली. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, मायनिंग आदींबाबत नारायण राणे यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात कोकणात जनमत तयार झालं होतं. त्यात शिवसेनेनेही आपली विस्कळीत झालेली संघटना पुन्हा उभी केली अन् २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राणेंना पहिला मोठा धक्का बसला. त्या निवडणुकीत विनायक राऊत यांनी राणेंचे पुत्र निलेश राणे यांचा तब्बल १ लाख ५१ हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर, काही महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत खुद्द नारायण राणे यांना मालवण-कुडाळ मतदारसंघात वैभव नाईक यांनी पराभूत केलं. या पराभवांमुळे सिंधुदुर्गातून राणेंचं वर्चस्व कमी झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं. त्यानंतर, २०१९ मध्ये विनायक राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांचा पुन्हा एकदा दारुण पराभव केला. यादरम्यान, मुंबईतल्या एका विधानसभा पोटनिवडणुकीत नारायण राणेंचा पराभव झाला होता तो वेगळाच. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून झालेले हे पराभव नारायण राणेंसाठी जिव्हारी लागणारे होते. तसेच याचा वचपा काढण्याची संधी ते बऱ्याच दिवसांपासून शोधत होते. ती संधी नारायण राणे यांना या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मिळाली असं म्हणता येईल.
मागच्या काही वर्षांत सिंधुदुर्गात वाढलेली ताकद, शिवसेनेत पडलेली फूट, तसेच सिंधुदुर्गातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांमध्ये असलेलं वर्चस्व या नारायण राणेंच्या जमेच्या बाजू आहेत. तसेच केंद्रातील मोदी सरकार आणि नरेंद्र मोदींची असलेली लोकप्रियता यांचा फायदा नारायण राणे यांना होण्याची शक्यता आहे. सावंतवाडी आणि कणकवली या मतदारसंघात सध्या राणे आणि भाजपा बऱ्यापैकी प्रबळ आहेत. त्यात केसरकर सोबत आल्याने त्यांची ताकद आणखी काही वाढणार आहे. तर कुडाळमध्ये मात्र ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वात ठाकरे गट राणेंना कडवी टक्कर देऊ शकतो.
एकट्या सिंधुदुर्गात आघाडी घेतली तरी ती राणेंसाठी पुरेशी ठरण्याची शक्यता कमी आहे. येथे विजय मिळवायचा असल्यास राणे आणि भाजपाला ठाकरे गटाचं रत्नागिरीतील वर्चस्व मोडून काढावं लागणार आहे. त्यात नाणार आणि बारसू प्रकल्पांविरोधात झालेलं आंदोलन राणे आणि भाजपासाठी अडचणीचं ठरू शकतं. त्याचा फटका राणे आणि भाजपाला राजापूर मतदारसंघात बसू शकतो. तर रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये तेथील आमदार उदय सामंत आणि शेखर निकम हे कितपत मदत करतात यावर राणेंच्या विजयाचं गणित अवलंबून असेल. त्यात या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरची दावेदारी सोडावी लागल्यानंतर सामंत बंधू यांनी खुलेपणाने मदत केली तर राणेंना ही लढाई सोपी होऊ शकते.
दुसरीकडे नारायण राणेंविरुद्ध लढायचं म्हटल्यावर ठाकरे आणि त्यांच्यासोबतचे नेते हे कमालीचे आक्रमक होत असतात. याच आक्रमकतेच्या जोरावर ठाकरेंनी राणेंचं दक्षिण कोकणातील वर्चस्व मोडून काढत त्यांना वारंवार पराभवाचे धक्के दिले होते. त्यामुळे आता पुन्हा थेट नारायण राणेंशीच लढत होणार असल्याने ठाकरे गट पेटून उठण्याची शक्यता आहे. तसेच विनायक राऊत यांनी याआधी दोन वेळा निलेश राणेंचा पराभव केलेला असल्याने ठाकरे गटाला राणेंना हरवण्याचा आत्मविश्वास नक्कीच असेल. विनायक राऊत यांनी मागच्या दहा वर्षांत सिंधुदुर्गात संघटनेची चांगली बांधणी केली होती. त्यामुळे केसरकर, सामंत आदी नेते सोडून गेले तरी या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला म्हणावे तसे मोठे खिंडार पडलेले नाही. ही बाब या निवडणुकीत विनायक राऊत यांच्यासाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. तसेच या मतदारसंघात विविध कारणांनी राणेंचा विरोध करणारा एक गट हा पूर्वीपासून प्रबळ आहे. त्याची साथ ही विनायक राऊत आणि ठाकरे गटाला मिळेल असंच चित्र आहे. येथील सध्याची परिस्थिती पाहता सिंधुदुर्गातील ठरावीक भाग, राजापूर आणि चिपळूण मतदारसंघातून आघाडी मिळवण्याची अपेक्षा विनायक राऊत यांना आहे. तसेच कोकणातील विविध पर्यावरणवादी आंदोलनांना ठाकरे गटाने पाठिंबा दिलेला असल्याने या आंदोलनात सक्रिय असणारा वर्ग राऊतांच्या बाजूने उभा राहू शकतो. त्याशिवाय भाजपाने फोडाफोडी करून शिवसेनेचे दोन तुकडे केल्याने उद्धव ठाकरे यांना मिळणाऱ्या सहानुभूतीचा फॅक्टरही येथे काही प्रमाणात चालू शकतो.
आणखी एक बाब म्हणजे यावेळी ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळालेले असल्याने आणि येथून महायुतीकडून भाजपाचा उमेदवार निवडणूक लढवत असल्याने शिवसेनेची ओळख असलेला धनुष्यबाण या मतदारसंघातून गायब झाला आहे. तसेच नारायण राणेंसोबत येथील शिवसेनेचं जुनं वैर आहे. त्यामुळे धनुष्यबाण नसल्याने शिंदे गटासोबत असलेला मतदारही राणेंकडे न वळता ठाकरे गटाला मतदान करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत विनायक राऊत यांच्या पारड्यातही घसघशीत मतदान पडू शकतं. एकंदरीत सध्यातरी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात चुरशीची लढत अपेक्षित आहे. आता अखेरच्या क्षणी येथील समीकरणं काय वळण घेतात यावर येथील अंतिम निकाल अवलंबून असेल.