लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील तीन मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आलेले आहेत. त्यापैकी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्यात लढत होत आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांनी केला आहे. घरात प्रचाराचं पत्रक पाठवण्यासाठी आलेल्या महिला कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा तसेच व्हिडीओ काढण्यासाठी गेले असता आपल्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला असा आरोप अयोध्या पौळ यांनी केला आहे.
या घटनेबाबत माहिती देताना अयोध्या पौळ यांनी सांगितले की, ज्या यशवंत जाधवांचे पार अंडरवर्ल्डपर्यंत संबंध आहेत. ते यशवंत जाधव एका सामान्य कार्यकर्तीला घाबरतात. म्हणून अशा बायका मला मारायला पाठवत आहेत. याबाबत मी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तसेच ज्या पुरुषाने माझा विनयभंग केला आणि ज्या महिलांनी मला मारहाण केली, त्या सगळ्यांना अटक व्हावी,अशी मागणी आहे, असे अयोध्या पौळ म्हणाल्या.
अयोध्या पौळ ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोशल मीडिया समन्वयक म्हणून काम पाहतात. तसेच आपल्या रोखठोक मतांमधून शिंदे गटातील अनेक नेत्यांवर टीकास्र सोडत असतात.