महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आज कोल्हापुरात होत आहे. या प्रचारसभेपूर्वी ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेमुळे महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. शिवरायांच्या गादीविरोधात प्रचारासाठी मोदी कोल्हापुरात येत आहेत. शाहू महाराजांना बिनविरोध निवडून देण्याचा आमचा प्रयत्न होता. पण मोदी येथे शाहू महाराजांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येत आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्या टीकेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शाहू महाराजांना महाविकास आघाडीने राज्यसभेवर का पाठवले नाही, असा सवाल हसन मुश्रिफ यांनी विचारला आहे.
संजय राऊत यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना सहन मुश्रिफ म्हणाले की, वास्तविक पाहता आमच्या छत्रपतींचा फार मोठा अपमान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यसभेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये शाहू महाराज छत्रपती यांना राज्यसभेवर पाठवलं असतं तर त्यांचा फार मोठा सन्मान झाला असता, शाहू महाराजांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून त्यांना दारोदारी हिंडवून, महाविकास आघाडीने त्यांचा फार मोठा अपमान केला आहे, असा टोला हसन मुश्रिफ यांनी लगावला.
मोदींच्या आजच्या सभेवरून कोल्हापूरमध्ये सोशल मीडियावर ‘भीती गादीची म्हणून सभा मोदींची’, असा मजकूर व्हायरल होत आहे. त्याबाबत विचारले असता हसन मुश्रिफ म्हणाले की, सन्मान गादीला आणि मत मोदीला हे आपण आधीच सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्ही गादीचा सन्मानच करतोय. मात्र मत मोदींना देणार आहोत, असेही मुश्रिफ यांनी सांगितले.
दरम्यान, महायुतीच्या उमेदवारांसाठी आज कोल्हापूरमध्ये होत असलेल्या सभेवर टीका करताना संजय राऊत म्हणाले होते की, छत्रपती शाहू आणि त्यांच्याआधीचे सगळे या गादीचे वारसदार यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोठं योगदान आहे. त्यामुळे भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांनी कोल्हापूरमधून उमेदवार उभं करणंच चूक आहे. छत्रपती शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्यावं आणि महाराष्ट्रातील शाहू, फुले, आंबेडकरांच्या परंपरेचा सन्मान करावा, अशी आमची इच्छा होती. कोल्हापूरची जागा शिवसेनेची होती. तरी आम्ही शाहू महाराज निवडणुकीला उभे राहताहेत हे ऐकल्यावर ती जागा त्यांच्यासाठी सोडली. पण भाजपाकडून नरेंद्र मोदी हे शाहूंच्या विरोधामध्ये प्रचार करण्यासाठी येताहेत. नरेंद्र मोदी हे शाहूंच्या विरोधात प्रचारासाठी कोल्हापुरात आले होते हे महाराष्ट्राची जनता कधीच विसरणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले होते.