महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यामध्ये मुंबई आणि आसपासच्या मतदारसंघांमध्ये सध्या प्रचाराची रणधुमाळी रंगली आहे. आज मुंबईत शिवाजी पार्क येथे महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांची सभा होणार आहे. तर बीकेसीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी इंडिया आघाडीची सभा होणार आहे. त्यातही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचारसभांचा धडाका लावला होता. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. नरेंद्र मोदी यांना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, महानगरपालिकेच्या वॉर्डनिहाय सभांसाठी निमंत्रण दिलं पाहिजे, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.
नरेंद्र मोदी यांच्या सभांवर टीका करताना अंबादास दानवे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांना येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात होणाऱ्या जिल्हा परिषद, ग्रामपंचायती आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे. ज्या पद्धतीने या महराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या ३०-३५ च्या वर सभा होत आहेत. याचा अर्थ येणाऱ्या काळात भाजपाला नरेंद्र मोदी हे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर पालिका, नगरपंचायत, ग्राम पंचायत यांच्या प्रचारालासुद्धा लागतील, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.
यावेळी अंबादास दानवे यांनी नरेंद्र मोदी यांनी मुंबईत केलेल्या रोड शोवरही टीका केली. ते म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांना मुंबईत पहिल्यांदा रोड शो करावा लागला, ही ताकद महाराष्ट्रातील जनता आणि महाराष्ट्राच्या मातीत आहे. सगळी दुनिया बंद करायची, मुंबई बंद करायची आणि रोड शो करायचा हा कुठला प्रकार आहे. बाजूलाच झालेल्या दुर्घटनेत लोकांचा मृत्यू झाला होता. तिथून रोड शो गेला, हे संवेदनाहिनतेचं लक्षण आहे, असा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला.
मोदी आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याने त्याचा काही फरक पडेल का, असं विचारलं असता अंबादास दानवे म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र आल्याने काहीही फरक पडणार नाही. राज ठाकरे यांच्या मनसेच्या इंजिनामध्ये भाजपाचा कोळसा भरला आहे. त्यावर ते चालू आहे. ज्या पक्षाचा एक उमेदवार उभा नाही तो पक्ष गावोगावी, घरोघरी जाऊन प्रचार करतोय, सुपारी घेण्याचा प्रकार किती उच्च स्तरावर असतं याचं उदाहरण राज ठाकरे यांनी दाखवून दिलं आहे.