मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे सुरुवातीचे कल आता स्पष्ट होत आहे. त्यात सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या ठाणे आणि कल्याण मतदारसंघात सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार पुढे असल्याचं चित्र आहे. ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे नरेश म्हस्के हे सध्या ७० हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. त्याठिकाणी दुसऱ्या नंबरवर राजन विचारे यांना १ लाख ३२ हजार मते पडली आहेत.
कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे ७० हजार मतांनी आघाडीवर आहेत. याठिकाणी श्रीकांत शिंदे यांना १ लाख ५४ हजाराहून अधिक मते आहेत तर उबाठा गटाच्या वैशाली दरेकर यांना ८४ हजार मते पडली आहेत. ठाणे आणि कल्याण मतदारसंघ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होम ग्राऊंड आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ४० हून अधिक आमदार आणि १२ खासदार उद्धव ठाकरेंना सोडून गेले. त्यानंतर ठाणे आणि कल्याण मतदारसंघात कोण उभं राहणार याची उत्सुकता सगळ्यांना होती.
ठाण्यात राजन विचारे हे विद्यमान खासदार होते. ते उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ठाकरेंनी राजन विचारे यांनाच उमेदवारी दिली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून विचारे निवडणुकीत उभे होते. तर महायुतीत ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली. त्यात एकनाथ शिंदेंनी त्यांचे विश्वासू असलेले नरेश म्हस्के यांना ठाण्यातून तिकीट दिले. मविआकडून सातत्याने म्हस्के यांचा राजन विचारेंकडून पराभव होईल असं बोललं जात होतं. त्यात नेते जरी शिंदेसोबत गेले असले तरी कार्यकर्ते आणि जनता उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचा दावा उबाठा गटाच्या नेत्यांकडून केला जात होता. परंतु ठाण्यात याउलट चित्र दिसत आहे.
कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार होते. श्रीकांत शिंदे यांना पाडण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कल्याण दौरा केला होता. त्याठिकाणी वैशाली दरेकर यांना उबाठा गटाने तिकीट दिले. श्रीकांत शिंदे यांचा पराभव करणारच असा चंग ठाकरे गटाने बांधला होता. परंतु ठाणे आणि कल्याण मतदारसंघात सध्या तरी शिंदेच्या शिवसेनेची सरशी होताना दिसते.