Maharashtra Lok Sabha Election Result 2024: मुंबई : काँग्रेस आणि भाजप यांच्यात १५ जागांवर लढत झाली. त्यातील उत्तर मध्य मुंबई, नंदुरबार, जालना, लातूर, नांदेड, अमरावती, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, धुळे आणि सोलापूर या ११ जागांवर काँग्रेसने भाजपला मात दिली. तर उत्तर मुंबई, अकोला, नागपूर आणि पुणे या चार जागांवर भाजपची सरशी झाली आहे.
भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या विदर्भात काँग्रेसने जबरदस्त मुसंडी मारली. तेथे काँग्रेसने जिंकलेल्या पाच पैकी चार जागांवर भाजपला धूळ चारली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडारा-गोंदिया या गृहजिल्ह्यात नवखे डॉ. प्रशांत पडोळे यांनी विजय मिळवला. शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना झाला.
दोघांचे पक्ष १३ मतदारसंघांमध्ये आमनेसामने होते. सगळ्यांचेच लक्ष लागलेला हा निवडणुकीचा सामना मुख्यमंत्री शिंदे यांनी सात विरुद्ध सहा असा जिंकला. ठाकरे यांचे ९ खासदार निवडून आले असून, शिंदेंचे सात खासदार जिंकले आहेत. उद्धवसेनेेने २१ जागा लढविल्या, तर शिंदेसेनेने १५ जागा लढविल्या. ठाकरेंच्या ठाण्यातील वर्चस्वाला शिंदेंनी जोरदार धक्का देत तेथील दोन्ही जागा जिंकल्या.
पुतण्यावर काकाच भारीबंड करत भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का बसला. त्यांना महायुतीत चार जागा मिळाल्या होत्या, पण एकच रायगडची जागा जिंकली. बारामती आणि शिरूरमध्ये काका-पुतण्यांचे पक्ष आमनेसामने होते. दोन्ही जागा काकांच्या म्हणजे शरद पवारांच्या पक्षाने जिंकल्या. बारामती आपलीच हे शरद पवार यांनी सिद्ध केले.
अजित पवार यांनी चार जागा लढून एकच म्हणजे २५ टक्के जागा जिंकल्या. मात्र, शरद पवार यांनी महाविकास आघाडीत १० जागा लढल्या आणि ६ म्हणजे ६० टक्के जागा जिंकल्या. विजयाच्या टक्केवारीतही काका हे पुतण्यापेक्षा सरस ठरले. बारामतीत सुप्रिया सुळे पराभूत झाल्या तर शरद पवार यांच्या राजकीय अस्तित्वावर मोठे प्रश्नचिन्ह लागेल, असे म्हटले जात होते. मुलीच्या विजयाने पवार यांनी टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. सुनील तटकरे यांच्या विजयात त्यांच्या पक्षापेक्षा स्वत:च्या प्रतिमेचा व जनसंपर्काचा तसेच मित्रपक्षांनी केलेल्या मदतीचा वाटा अधिक आहे.
वेळेवर उमेदवारीचा शिंदेंना फटका शिंदेसेनेच्या ज्या जागांचे उमेदवार वेळेवर जाहीर झाले, तिथे त्यांचा पराभव झाला.राजश्री पाटील (यवतमाळ-वाशिम), यामिनी जाधव (दक्षिण मुंबई), हेमंत गोडसे (नाशिक) यांचा त्यात समावेश आहे. नरेश म्हस्के (ठाणे) जिंकले, तर रवींद्र वायकर (उत्तर-पश्चिम मुंबई) यांनी निसटता विजय मिळविला.
टक्केवारीतही शिंदेच पुढे यशाच्या टक्केवारीतही ठाकरे पुढे आहेत. त्यांनी २१ जागा लढल्या आणि ९ जागांवर म्हणजे ४३ टक्के जागांवर आघाडी घेतली, तर शिंदेंनी १५ जागा लढून ७ म्हणजे ४७ टक्के जागा जिंकल्या.