Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : काँग्रेस आणि भाजप यांच्यात १५ जागांवर लढत झाली. त्यातील उत्तर मध्य मुंबई, नंदुरबार, जालना, लातूर, नांदेड, अमरावती, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, धुळे आणि सोलापूर या ११ जागांवर काँग्रेसने भाजपला मात दिली. तर उत्तर मुंबई, अकोला, नागपूर आणि पुणे या चार जागांवर भाजपची सरशी झाली आहे. भाजपाचा गड मानल्या जाणाऱ्या विदर्भात काँग्रेसने जबरदस्त मुसंडी मारली. याच दरम्यान संजय राऊत यांनी निवडणूक निकालावर भाष्य केलं आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार हल्लाबोल केला आहे. "वाराणसीत नरेंद्र मोदींना विजयासाठी संघर्ष करावा लागला. मोदींनी पदाचा राजीनामा देऊन संन्यास घ्यायला हवा. मोदींनी आधी शपथ घेऊ द्या. शपथ घेतल्यावर घरी पाठवण्यात मजा असते. नरेंद्र मोदी हा ब्रँड संपला" असं म्हणत सूचक संकेत दिले आहेत.
"मोदींना विजयासाठी संघर्ष करावा लागला"
"अयोध्येत भाजपाचा पराभव झाला यापेक्षा वाईट गोष्ट काय आहे. वाराणसीत नरेंद्र मोदींना विजयासाठी संघर्ष करावा लागला. दोन लाखांचं देखील त्यांना मताधिक्य नाही. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये ते मागे होते. अमित शाह यांचं मताधिक्य त्यापेक्षा जास्त आहे. वायनाड आणि रायबरेलीमध्ये राहुल गांधी हे चार लाखांच्या मताधिक्याने जिंकले."
"मोदींनी पदाचा राजीनामा देऊन संन्यास घ्यायला हवा"
"देशाचे पंतप्रधान जे ईश्वराचे अवतार आहेत. त्यांना विजयासाठी संघर्ष करावा लागला. नैतिकदृष्ट्या हा मोदींचा पराभव आहे. मोदींनी पदाचा राजीनामा देऊन संन्यास घ्यायला हवा. ज्या रामाच्या नावावर त्यांनी मोठं राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्या उत्तर प्रदेशमध्ये प्रभू श्रीरामाने आणि बजरंगबलीने त्यांच्या डोक्यात गदा मारली आहे. समाजवादी पार्टी आणि काँग्रेसला त्यांच्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत."
"नरेंद्र मोदी हा ब्रँड संपला"
"मोदींचं सरकार चालणार नाही, टिकणार नाही. लोकं तुम्हाला घाबरत नाही. आम्ही तुमच्यापुढे झुकलो नाही, झुकणार नाही. मोदींना तिसऱ्यांदा आपल्या नावावर शपथ घ्यायचा विक्रम करायचा आहे तो करू द्या. मोदींनी शपथ घेऊद्या. शपथ घेतल्यावर घरी पाठवण्यात मजा असते. नरेंद्र मोदी हा ब्रँड संपला. बहुमत मिळालं नाही म्हणजे तुमचा ब्रँड संपला आहे" असं म्हणत संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.