Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : निकालानंतर सुंदाेपसुंदी, भाजपच्या सर्व्हेवर शिंदेसेनेची नाराजी; अजित पवारांच्या बैठकीस आमदारांची दांडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 06:26 AM2024-06-07T06:26:54+5:302024-06-07T07:03:15+5:30
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला पाच आमदारांनी दांडी मारल्याने ते नेमके गेले कुठे अशा चर्चा रंगल्या.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालानंतर महायुतीमध्ये जोरदार सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. भाजपचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांच्या पुत्रांनी थेट रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर दावा केला. शिंदेसेनेतील आमदारांनी थेट भाजपच्या सर्व्हेवरच बोट दाखवत त्यामुळेच नुकसान झाल्याचे म्हटले. अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला पाच आमदारांनी दांडी मारल्याने ते नेमके गेले कुठे अशा चर्चा रंगल्या.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश साधता आले नाही. याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारत भाजप नेते फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद सोडत सरकारमधून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर भाजप नेत्यांकडून त्यांची मनधरणीही करण्यात आली. सागर बंगल्यावर बुधवारी पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीही आमदार व नेत्यांनी फडणवीसांची भेट घेऊन निर्णय मागे घेण्याची विनंती केली. नागपुरात संघाचे पदाधिकारी फडणवीस यांना घरी जाऊन भेटले.
जनतेची इच्छा पक्षश्रेष्ठींकडून पूर्ण नाही
यवतमाळ वाशिममध्ये राजश्री पाटील यांच्या पराभवानंतर भावना गवळी यांनी आपली खदखद बोलून दाखविली. कधी कधी सत्य कटू असते. पण ते बोलले पाहिजे. जनतेच्या काही इच्छा पक्षश्रेष्ठींकडून पूर्ण झाल्या नाहीत. ती मताच्या रूपाने जनतेने दाखवली. इथल्या सर्वसामान्य माणसाच्या मनात मी होते. पण मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर दबाव होता, अशी खदखद भावना गवळी यांनी बोलून दाखवली.
मुख्यमंत्र्यांसोबत प्रासंगिक करार : सत्तार
अब्दुल सत्तार यांनी तर थेट काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांची भेट घेतली व त्यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जोपर्यंत माझ्यावर विश्वास आहे. तोपर्यंत त्यांच्याशी केलेला प्रासंगिक करार कायम राहील. ज्या दिवशी माझ्यावरचा त्यांचा विश्वास उडेल तेव्हा मी योग्य निर्णय घेईन, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी खळबळ उडवून दिली. त्यांनी जालना विधानसभेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे काम केल्याचा दावाही केला मात्र मनात कल्याण काळेच होते, असे सांगताना त्यांनी जालन्यात मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा प्रभाव असल्याचे अधोरेखित करून आपल्यावरील आरोप फेटाळले. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर अब्दुल सत्तार काँग्रेसमध्ये परतणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
अजित पवारांचे आमदार गेले कुठे?
अजित पवार गटाकडून पराभवाचे आत्मचिंतन करण्यासाठी हॉटेल ट्रायडंट येथे आयोजित बैठकीला उपस्थित आमदारांनी पराभव झाला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला. मात्र सकाळी बैठकीला उपस्थित असलेले पाच आमदार संध्याकाळी बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. यामुळे हे आमदार गेले कुठे अशा चर्चा रंगल्या. धर्मरावबाबा आत्राम, नरहरी झिरवळ, सुनील टिंगरे, राजेंद्र शिंगणे आणि अण्णा बनसोडे अशी बैठकीला दांडी मारणाऱ्या पाच आमदारांची नावे आहेत.
रामराजे नाईक निंबाळकर अजित पवारांच्या बैठकीला
फलटणचे नेते व माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी महायुतीच्या विरोधात काम करून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा पराभव केला आणि गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीलादेखील ते उपस्थित राहिले. यामुळे अजित पवारांचा गट चांगलाच बुचकळ्यात पडला.