Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाची देशभरात पिछेहाट होत असताना महाराष्ट्रामध्येही भाजपा दारुण पराभवाच्या मार्गावर असल्याचं चित्र दिसत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये भाजपाने १४ जागांवर आघाडी घेतली आहे. मात्र यातील अनेक ठिकाणी भाजपाची आघाडी अगदीच नाममात्र असून, या ठिकाणचे निकाल बदलण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक टीका केली आहे. असली नकली शिवसेनाबाबत बोलताना, "बाप बाप होता है" असं देखील सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. "अजून निकाल बाकी आहेत. मला अनेक जागांवर अपेक्षा आहे. आशादायी आहे. लोकांना फोडाफोडीचे राजकारण आवडत नाही, त्यांना पारदर्शक राजकारण आवडतं."
"देवेंद्र फडणवीस यांच्या अतिमहत्त्वकांक्षेमुळे हा फटका बसला आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा कधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत, ते येतील पण विरोधी बाकावर बसतील. मी राज्यभर फिरले, राहुल गांधींच्या यात्रेचा परिणाम दिसतोय. उत्तर प्रदेशातील जागा पाहून आश्चर्य वाटतं. हे सर्व चित्र आशादायी आहे" असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील मोठा पक्ष असलेल्या भाजपाने २८ जागा लढवल्या होत्या. मागच्या निवडणुकीत २५ पैकी २३ जागा जिंकणाऱ्या भाजपासमोर यावेळी चांगली कामगिरी करण्याचे आव्हान होते. मात्र महाविकास आघाडी आणि विशेषकरून काँग्रेसने दिलेल्या आव्हानामुळे भाजपाला महाराष्ट्रात मोठा धक्का बसताना दिसत आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये भाजपाचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भारती पवार हे मोठ्या मताधिक्याने पिछाडीवर पडले आहेत.