मुंबई : प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीच्या लढाईत स्वत:चे अस्तित्व टिकविले; परंतु एकाही ठिकाणी त्यांना यश आले नाही. मात्र, ८ मतदारसंघांमध्ये विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा अधिक मते वंचितच्या उमेदवारांना मिळाली. वंचितच्या ३८ उमेदवारांपैकी ॲड. आंबेडकर वगळता ३७ जणांची अनामत रक्कम जप्त झाली.
वंचितने विजयाच्या मताधिक्यापेक्षा जास्त मते घेतली तिथे अनुप धोत्रे (भाजप), नागेश आष्टीकर (उद्धवसेना), प्रतापराव जाधव (शिंदेसेना), वसंतराव चव्हाण (काँग्रेस), भाऊसाहेब वाकचौरे (उद्धवसेना), बजरंग सोनवणे (शरद पवार गट), धैर्यशील माने (शिंदेसेना), रवींद्र वायकर (शिंदेसेना) हे निवडून आले. याचा अर्थ महायुती व मविआचे प्रत्येकी ४ उमेदवार निवडून आले.
या मतदारसंघांमध्ये वंचितच्या उमेदवाराची अनामत झाली जप्त अहमदनगर, औरंगाबाद, बीड, भंडारा-गोंदिया, बुलडाणा, चंद्रपूर, दिंडोरी, गडचिरोली-चिमूर, हातकणंगले, हिंगोली, जळगाव, जालना, कल्याण, लातूर, माढा, मावळ, उत्तर मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे रायगड, रामटेक, रत्नागिरी, रावेर, सातारा, शिर्डी, शिरूर, वर्धा या मतदारसंघांमधील वंचितच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. अकोला मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मात्र, अनामत रक्कम वाचली. मागील निवडणुकीत वंचितने ४८ पैकी ४७ जागा लढवित ६.९२ टक्के इतकी मते मिळविली होती.