अहंकार, अनीतीला मतदारांची चपराक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 11:09 AM2024-06-11T11:09:49+5:302024-06-11T11:10:34+5:30
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करावयाचे झाले तर गेल्या दहा वर्षांमध्ये लोकशाही व संविधानावर आवडला गेलेला गळफास आता या निकालामुळे सैल झाला आहे असे म्हणावे लागेल. लोकशाहीला आता मोकळा श्वास घेता येईल.
- सचिन सावंत
(सरचिटणीस, काँग्रेस)
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करावयाचे झाले तर गेल्या दहा वर्षांमध्ये लोकशाही व संविधानावर आवडला गेलेला गळफास आता या निकालामुळे सैल झाला आहे असे म्हणावे लागेल. लोकशाहीला आता मोकळा श्वास घेता येईल. महाभारतामध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण दुर्योधन व दु:शासन करत होते तेव्हा द्रोणाचार्य, भीष्माचार्य तथा सभागृहातील सर्वजण स्वस्थ बसले होते. त्यावेळी जनार्दनाने येऊन द्रौपदीचे लज्जारक्षण केले. गेली दहा वर्षे लोकशाहीचे वस्त्रहरण होत होते आणि लोकशाहीचे रक्षण करण्याची ज्यांची जबाबदारी होती त्या सर्व संविधानिक संस्था सरकारच्या भाट झाल्या होत्या किंवा आत्मबळ हरवून बसल्या होत्या. अशावेळी लोकशाहीचे रक्षण हे जनता जनार्दनाने केले आहे.
ही निवडणूक देशासाठी अत्यंत महत्त्वाचे होती यात शंका नाही. निवडणुकीमध्ये लोकशाहीला अभिप्रेत असलेल्या सत्ताधारी व विरोधकांना समान संधीचा मागमूसही नव्हता. दोन मुख्यमंत्री व अनेक नेते जेलमध्ये पाठवले गेले होते. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाची खाती गोठवण्यात आली होती. महाराष्ट्रात दोन पक्ष फोडण्यात आले किंबहुना चोरण्यात आले. निवडणूक आयोग हा निष्पक्ष आहे असे म्हणणे धाडसाचे ठरत आहे. भाजपच्या आर्थिक व सत्तेच्या पाशवी बळाविरोधात लढणे सोपे नव्हते. ही लढाई खरे तर जनतेनेच हाती घेतली आणि भाजपचा देशभर उधळलेला वारू महाराष्ट्राने रोखला. अहंकार, अनीती आणि अत्याचार जनतेला चालत नाही हे या निकालांमधून पुन्हा एकदा स्पष्टपणे अधोरेखित झाले, याचे समाधान वाटते.
उत्तर मुंबईतील जागा आम्ही मोठ्या फरकाने हरलो याचे दुःख जरूर आहे.
यावेळी भाजपने उमेदवार लवकर घोषित केला. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला प्रचार करण्यासाठी खूप वेळ मिळाला.
महाविकास आघाडीतील जागावाटप अजून लवकर झाले असते आणि काँग्रेस पक्षाचा उमेदवार लवकर घोषित झाला असता तर लढाई अधिक जोमाने लढता आली असती.
विधानसभा निवडणुकीत जागावाटप लवकर व्हावे ही अपेक्षा आहे.
ही लढाई महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने लढून भाजपला धोबीपछाड दिली याचा आनंद आहे.
अभूतपूर्व समन्वय
लोकशाही वाचवण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र आणण्याकरिता काँग्रेसला त्यागाची भूमिका घ्यावी लागली. यामुळे काही नेते पक्ष सोडूनही गेले. परंतु पक्षापेक्षा देशहित महत्त्वाचे, हा त्यामागे काँग्रेस पक्षाचा उद्देश होता. इंडिया आघाडीमधील सर्व पक्षांचा एकमेकांशी अभूतपूर्व समन्वय होता हे आवर्जून सांगावे लागेल.