मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा नेत्यांकडून जातीय आणि विषारी प्रचार करण्यात आल्याची टीका करत संसदेत खासदार असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झगडत होते. यापुढेही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत राहणार, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.
शुक्रवारी राजू शेट्टी एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला शेतकऱ्यांशी देणं-घेणं नसल्यामुळे विरोध होता. त्यामुळे नरेंद्र मोदी सरकारची साथ सोडल्याचा पश्चाताप होत नाही. संसदेत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झगडत होते. यापुढेही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत राहणार आहे, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीमुळे पराभवाला सामोरे जावे लागल्याचेही राजू शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीमुळे राज्यात 8 ते 9 ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला फटका बसला. तसेच, यंदाच्या निवडणुकीत भाजपा नेत्यांकडून भाजपा नेत्यांकडून जातीय आणि विषारी प्रचार करण्यात आल्याची टीकाही राजू शेट्टी यांनी केली.
दरम्यान, संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने ‘जायंट किलर’ ठरले आहेत. धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा 96 हजार 39च्या मताधिक्याने पराभव केला. या निवडणुकीत धैर्यशील माने यांना 585776 मते पडली तर राजू शेट्टी यांना 489737 मते पडली.