मुंबई : कमळावर लढणारा भाजप, धनुष्य हातात घेतलेली शिंदे सेना आणि चार जागांवर घड्याळावर टिकटिक करत सोबत असलेला अजित पवार गट अशी महायुती एकीकडे आणि दुसरीकडे पंजा दाखवत असलेली १३९ वर्षांची काँग्रेस आणि फाटाफुटीचे धक्के बसलेली उद्धव सेना (मशाल) आणि शरद पवार गट (तुतारी) यांची महाविकास आघाडी यांच्यातील निवडणूक युद्धाचा फैसला मंगळवारी होईल.
मोदी फॅक्टर, राज्यातील सत्ताप्रयोग, शेतकऱ्यांचे प्रश्न, प्रचाराच्या धुराळ्यात झडलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, संविधान बदलाची चर्चा, मुस्लिम आरक्षण या विषयांवर महायुती विरुद्ध महाविकास आघाडीने रण पेटविले, मतदारांना त्यातून काय भावले, काय पसंत नाही पडले याचा निकालही मंगळवारी येणार आहेच. सत्ताधारी महायुतीसाठी तसेच महायुतीला धक्के देण्यासाठी सज्ज असलेल्या मविआसाठीही ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्ये भाजपची जोरदार हवा असल्याचे चित्र होते, दक्षिणेत भाजपचे कमळ काही ठिकाणी फुलेल पण मोठा फायदा भाजपविरोधी पक्षांनाच होईल, असे म्हटले जात होते. महाराष्ट्रात काय होणार, याची उत्सुकता देशाला लागून राहिली आहे. भाजपचे दिग्गज नेते महाराष्ट्राच्या रणांगणात उतरले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीसाठी वातावरण ढवळून काढले. मविआसाठी राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केले. कोणाच्या झंझावाताला यशाची फळे येतात याचा फैसला काही मिनिटांवर येऊन ठेपला आहे.
मतदारांची साथ कुणाला?मराठा आंदोलनाच्या निमित्ताने उद्भवलेली जातीय समीकरणे, मुस्लिम आणि दलित मतदारांनी महाविकास आघाडीला साथ दिल्याची सर्वत्र असलेली चर्चा, पहिल्या-दुसऱ्या टप्प्यानंतर धार्मिक वळणावर गेलेली निवडणूक या पार्श्वभूमीवर मतदारांनी कोणाला साथ दिली हे मंगळवारी सकाळपासून कळू लागेल आणि दुपारनंतर चित्र स्पष्ट होईल.
वंंचितला कितपत यश मिळणार?ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला यावेळी काही यश मिळेल का? या पक्षामुळे मतविभाजन होऊन अन्य कोणाला त्याचा फायदा होईल का? हेही निकालानंतर स्पष्ट होणार आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर (अकोला), राजू शेट्टी (हातकणंगले), विशाल पाटील (सांगली), राजेश पाटील (पालघर), नीलेश सांबरे (भिवंडी) या लहान पक्षांच्या वा अपक्ष उमेदवारांना मतदारांनी कितपत संधी दिली हेही निकालातून समोर येणार आहे.