- वसंत भाेसलेसंपादक, काेल्हापूर
कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्रात सहापैकी चार जागा जिंकून महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार फटका दिला आहे. भाजपच्या विद्यमान तिन्ही उमेदवारांचा पराभव झाला. शिंदेसेनेला एक आणि उदयनराजे यांच्या रुपाने भाजपला साताऱ्याची जागा मिळाली.
कोल्हापुरात महाविकासची एकजूट, सतेज पाटील यांची आक्रमक प्रचार यंत्रणा व शाहू महाराज यांच्या विषयी असलेल्या सहानभुतीने काँग्रेसने बाजी मारली. साताऱ्यात उदयनराजे व शशिकांत शिंदे ही लढत चुरशीची झाली. सातारा, जावळी, वाई, कोरेगाव या परिसरातील मताधिक्यावर शेवटच्या फेऱ्यात भाजपचे उदयनराजे विजयी झाले.
सोलापूरला माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे या तीन महिन्यापासून पायाला भिंगरी लावून फिरत होत्या. शिंदे आणि पवार यांच्या जोडण्यामुळे भाजपने प्रतिष्ठा पणाला लावूनही प्रणिती शिंदे विजयी झाल्या. माढा मतदारसंघात शरद पवार यांनी आपल्या प्रदीर्घ काळाच्या राजकारणाचा वापर करीत अकलूजच्या मोहिते-पाटील यांच्या घराण्यातील उमेदवार काढला. त्यामुळेच धैर्यशिल मोहिते-पाटील यांचा विजय सोपा झाला.
हातकणंगलेत ऐनवेळी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी महाआघाडीत न येण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना तर फटका बसलाच पण उद्धवसेनेचे उमेदवार सत्यजित पाटील यांनाही तयारीने उतरता आले नाही. शिंदेसेनेचे धैर्यशील माने यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन दिवस मतदारसंघात तळ ठोकून बळ दिल्याने शेवटच्या फेऱ्यात निवडून आले. त्यांचा हा सलग दुसरा विजय आहे.