काेल्हापूर : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सहा दशकांच्या राजकारणात त्यांचा कधी, काेणत्याही निवडणुकीत पराभव झाला नाही. मार्च १९६७ पासून ते विधिमंडळ किंवा संसदेचे सलग ५७ वर्षे सदस्य आहेत. मात्र, आजवर तीन पराभव पवार कुटुंबीयाच्या सदस्यांचे झाले आहेत. त्यात मंगळवारी लाेकसभेच्या निकालात सुनेत्रा पवार यांची भर पडली. शरद पवार यांच्या घराण्यातील चार पिढ्यांनी राजकारणात वावर केला आहे. माताेश्री शारदादेवी पवार यांनी लाेकल बाेर्डाच्या निवडणुका यशस्वीपणे लढविल्या हाेत्या. शरद पवार यांनी वयाच्या सत्ताविसाव्या वर्षीच बारामतीतून आमदारकीची निवडणूक लढविली आणि जिंकली.
पहिला पराभव शरद पवार विद्यार्थी असताना १९५८ मध्ये बारामतीचे काँग्रेसचे खासदार केशवराव जेधे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेची पाेटनिवडणूक झाली हाेती. काँग्रेसने जेधे यांचे चिरंजीव गुलाबराव यांना उमेदवारी दिली हाेती. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठिंब्यावर शेतकरी कामगार पक्षाकडून शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू वसंतराव पवार यांना उमेदवारी देण्यात आली हाेती. श्रीमती शारदा पवार या शेकापचे काम करीत हाेत्या. शरद पवार हे काँग्रेसमध्ये काम करीत असल्याने माताेश्रींच्या परवानगीने त्यांनी जेधे यांचा प्रचार केला. त्या पाेटनिवडणुकीत वसंतराव पवार यांचा पराभव झाला.
दुसरा पराभव शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे आदींनी राजकारणात काम करताना अनेक निवडणुका लढविल्या. कधी हार पाहिली नाही. वसंतराव पवार यांच्यानंतर २०१९ मध्ये दुसरा पराभव अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा मावळ लाेकसभा मतदारसंघातून झाला. पार्थ पवार आणि राेहित पवार यांच्या रूपाने पवार कुटुंबीयांतील चाैथी पिढी राजकारणात आली आहे.
तिसरा पराभव राष्ट्रवादीमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार, अशी फूट पडल्याने बारामती मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार, अशी लढत झाली. यात पवार घराण्याचा विजय झाला असला तरी सुनेत्रा पवार यांच्या रूपाने तिसरा पराभवही झाला.