मुंबई : भाजपची महाराष्ट्रात झालेल्या पिछाडीची मी जबाबदारी स्वीकारतो. आपण स्वत: कुठेतरी कमी पडलो. ती कमतरता भरून काढण्यासाठी व विधानसभेकरिता पूर्णवेळ काम करायचे असून, मला सरकारमधून मुक्त करावे, अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारी दर्शविली आहे. फडणवीस यांनी असा कोणताही निर्णय घेऊ नये, यासाठी भाजप नेत्यांकडून त्यांना गळ घालती जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पराभवाची जबाबदारी सामूहिक असल्याचे म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बुधवारी भाजपच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात पराभवावर चर्चा करण्यात आली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी पक्षामध्ये पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी, ज्यामुळे राहिलेल्या कमतरता पूर्ण करण्यासाठी मला वेळ देता येईल. बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही करायचे आहे, ती आमची टीम करेल. त्यांच्यासोबत मी असणार आहे. यासंबंधी पक्षातील वरिष्ठांशी मी भेटणार आहे.
संविधान व मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील प्रचाराचा फटकासंविधान बदलण्याच्या विरोधकांच्या प्रचाराचा जनमानसावर मोठा परिणाम झाला. मराठा आरक्षणाबाबतच्या मुद्द्याचा आम्हाला फटका बसला. कांदाप्रश्नाचाही प्रचार झाला. आम्ही मराठा आरक्षण दिल्यानंतरही त्याबाबत विरोधकांच्या प्रचाराला आम्ही उत्तर देऊ शकलो नसल्याचे फडणवीस म्हणाले.
एकनाथ शिंदे, पवार यांच्यासोबत बैठक घेणारमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊ. समन्वयाच्या विषयांवर चर्चा करू. निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केले आहे. त्याबाबत त्यांचे अभिनंदन करतो, असेही फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.